‘चंद्रयान-३’सारख्या मोहिमा यशस्वी होण्यासाठी ‘इस्रो’ला आणखी निधी आणि पाठबळ देण्याची आवश्यकता !
मराठी, हिंदी, तसेच भारतातील जवळपास सर्वच भाषांतील बालगीतांत ज्या चंद्राचा उल्लेख येतो, त्या चंद्राचे आकर्षण भारतियांना नेहमीच राहिले आहे. या चंद्रावर जाण्यासाठी ‘भारतीय अवकाश संशोधन संस्था’ म्हणजेच ‘इस्रो’ सज्ज झाली असून १४ जुलैला ‘चंद्रयान-३’ दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी अवकाशात झेपावलेले असेल ! आजपर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन हे ३ देश चंद्रावर पोचले आहेत; मात्र इस्रोच्या म्हणण्यानुसार ‘चंद्रयान’ चंद्राच्या अशा भागावर उतरणार आहे, जिथे आजपर्यंत कुणी पोचू शकलेले नाही.’ वर्ष १९८४ मध्ये भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी रशियाच्या अंतराळ यानातून पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर प्रवेश केला. तेव्हापासून प्रत्येक भारतियाने ‘भारतानेही चंद्रावर पाऊल ठेवावे’ हे स्वप्न पाहिले. ते स्वप्न आता साकार होत आहे. अत्यंत अल्प मूल्यात आणि अधिकाधिक स्वदेशी तंत्रज्ञान वापरून भारतीय शास्त्रज्ञांची ही कामगिरी जागतिक स्तरावर भारताची मान निश्चितच उंचावणारी आहे !
भारताची भरारी !
वर्ष १९४५ मध्ये पहिले महायुद्ध संपल्यानंतर २० व्या शतकापर्यंत केवळ अमेरिका आणि रशिया अवकाश संशोधनात आघाडीवर होते. त्या वेळी अवकाश तंत्रज्ञान विकसित करणे भारतियांसाठी जवळजवळ अशक्यच होते. अशा प्रसंगी भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांनी ‘आगामी काळात अवकाश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाचा विकास करता येईल’, हे जाणून त्यादृष्टीने पावले उचलण्यास प्रारंभ केला. भारतीय अंतराळ कार्यक्रमात डॉ. विक्रम साराभाई यांचे योगदान अमूल्य आहे. कर्णावतीमध्ये (गुजरात) संशोधन प्रयोगशाळेच्या स्थापनेनंतर डॉ. साराभाई त्याचे संचालक झाले. यानंतर सक्षम, कुशाग्र शास्त्रज्ञांच्या एकनिष्ठेने काम करणार्या गटाने भारताच्या अंतराळ प्रगतीच्या प्रवासाला प्रारंभ केला. विशेषकरून वर्ष २०१४ नंतर भारताने या क्षेत्रात विलक्षण प्रगती केली असून भारत जगातील प्रगत देशांच्या तोडीचे तंत्रज्ञान उभे करण्यात यशस्वी झाला आहे.
दूरसंचार, दूरदर्शन प्रसारण या कामांसाठी भारतीय राष्ट्रीय उपग्रह कार्यक्रमाचा विकास हे इस्रोचे एक उल्लेखनीय कार्य आहे. यामुळेच आज भारतातील लोक विविध उपग्रहांद्वारे मनोरंजनाचे आणि ज्ञानाचे कार्यक्रम पाहू शकतात. विशेष म्हणून अत्यंत अल्प गुंतवणुकीत आणि दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करता ‘इस्रो’ने जे साध्य करून दाखवले, ते जागतिक स्तरावर आजपर्यंत कुणीही साध्य करू शकलेले नाही. यासह ‘भारतीय रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट कार्यक्रम’ हा भारताच्या भौतिक आणि आर्थिक विकासासाठी, तसेच पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
चीनप्रमाणे प्रगती आवश्यक !
भारत वर्ष २०२३ मध्ये चंद्रावर यान उरवण्याची सिद्धता करत आहे, तर आपला प्रमुख शत्रू असलेला चीन अवकाश क्षेत्रात आपल्या कित्येक पटीने पुढे आहे. वर्ष २००३ मध्ये चीनने पहिल्यांदा अवकाशात मनुष्य पाठवला. यानंतर प्रत्येक वर्षी चीनने या क्षेत्रात वेगाने घौडदौड चालूच ठेवत वर्ष २०१८ मध्ये ३९ रॉकेट सोडले, ज्यांतील केवळ १ अयशस्वी ठरले. याच काळात अमेरिकेने ३४, तर रशियाने २० रॉकेट सोडले होते. यानंतर १५ जून २०२३ ला चीनने एकाच वेळी ४१ उपग्रह अवकाशात सोडून एक विशिष्ट उंची प्राप्त केली. चीन, रशिया आणि अमेरिका अवकाश क्षेत्रातील संशोधनासाठी अब्जावधी व्यय करतात. भारतालाही जर या सर्वांच्या पुढे जायचे असेल, तर निश्चित या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करावी लागेल. या क्षेत्रातील शास्त्रज्ञांना काम करण्यासाठी अधिक मोकळीक द्यावी लागेल.
‘नंबी’ प्रकरणांची पुनरावृत्ती नको !
वर्ष १९९४ मध्ये इस्रो एकेक पाऊल पुढे टाकत असतांना देशभक्त शास्त्रज्ञ डॉ. नंबी नारायणन् यांच्यावर इस्रोमधील अंतराळ कार्यक्रमाची गुप्त माहिती फोडून अन्य देशांना विकण्याचा खोटा आरोप ठेवून त्यांना ५० दिवस कारागृहात काढावे लागले. केरळमधील तत्कालीन काँग्रेस सरकारच्या या कृत्यामुळे डॉ. नंबी नारायणन् यांना ऐन तारुण्याच्या काळात देशद्रोही म्हणून हिणवून घ्यावे लागले. डॉ. नंबी नारायणन् यांना २० वर्षे न्यायालयाची लढाई लढावी लागली आणि वर्ष २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दोषमुक्त करत ५० लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश केरळ सरकारला दिला.
या घटनेमुळे भारत मात्र क्रायोजेनिक इंजिनमध्ये द्रवरूप इंधन बनवण्याच्या प्रयोगात कित्येक दशके मागे फेकला गेला. हा प्रयोग जर यशस्वी झाला असता, तर आताची परिस्थिती वेगळी असती. भारताला आता जे यश मिळत आहे ते काही दशके आधीच मिळाले असते. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) न्यायालयात डॉ. नंबी नारायणन् यांची अटक हा एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग होता आणि ज्यात काही आरोपींचे अन्वेषण आवश्यक असल्याचे सांगितले आहे. डॉ. नंबी नारायणन् यांनी या संदर्भात लिहिलेल्या पुस्तकात ‘अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’ने भारतीय आकाश कार्यक्रम पुढे जाऊ नये; म्हणून कट रचून मला त्यात अडकवले’, असे लिहिले आहे. अशा घटनांमुळे भारताची प्रतिमा तर मलीन झालीच; मात्र अशा प्रकारे काम करणार्या देशभक्तांचे खच्चीकरणही झाले. सध्या भारताची सर्वच क्षेत्रांत वेगाने घौडदौड चालू आहे. हे भारताच्या शत्रूंना खुपत असणार. हे लक्षात घेऊन नंबी नारायणन् यांच्यासारख्या घटनेची पुनरावृत्ती भारताने टाळणे अत्यावश्यक आहे.
याचसमवेत भारतीय अवकाश संशोधन संस्था आणखीन सक्षम बनवण्यासाठी त्याला पुरेसा निधी देणे, सातत्याने तरुण आणि नवीन शास्त्रज्ञ निर्माण होण्यासाठी, तसेच नवीन संशोधन होण्यासाठी भारत शासनाने प्रभावी कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. असे झाल्यास लवकरच पहिला भारतीय चंद्रावर पोचलेला दिसेल !