गोवा : नेरूल येथील श्री कालीमाता मंदिर पाडण्याचा प्रयत्न भक्तगणांनी सतर्कतेने हाणून पाडला !

कारवाईसाठी आलेले शासकीय पथक ‘घुमटी’ न सापडल्याने माघारी परतले

नेरूल येथील श्री कालीमाता देवी

पणजी, २७ जून (वार्ता.) – नेरूल येथील श्री कालीमाता मंदिरावर कारवाई करण्यासाठी न्यायालयाचा आदेश घेऊन मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाट्यासह एक पथक २७ जून या दिवशी मंदिर परिसरात आले. या पथकामध्ये एका चर्चचा पाद्रीही उपस्थित होता. कारवाई करणार असल्याचे समजल्यावर मंदिराच्या रक्षणासाठी भक्तगण मोठ्या प्रमाणावर मंदिरात एकवटले.

श्री कालीमाता मंदिरावर कारवाईसाठी पथक आल्याचे कारवाई पथकातील पाद्रयाचे म्हणणे होते; मात्र कारवाई पथकातील एका अधिकार्‍याने आदेशानुसार ही कारवाई ‘घुमटी’वर (अत्यंत छोटे कोनाड्यासारखे मंदिर) करायची आहे, असे सांगितले. (कारवाई पथकासमवेत पाद्रयाचे काय काम ? यावरून हे पाद्रयाचे षड्यंत्र आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ठरू नये ! यावरून धार्मिक सौहार्द बिघडला असता, तर त्याला कुणाला उत्तरदायी धरले गेले असते ? या गोष्टीची चौकशी व्हायला हवी ! – संपादक) यावर मंदिर विश्वस्तांनी ‘घुमटी कुठे आहे ती दाखवा आणि नंतर कारवाई करा’, असा पवित्रा घेतला; मात्र या पथकाला कारवाई करण्यासाठी घुमटी न सापडल्याने ते माघारी परतले. घटनास्थळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा होता. मंदिराच्या रक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर एकवटलेल्या भक्तगणांनी मंदिराच्या प्रवेशद्वारात उभे राहून कारवाई पथकाला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले आणि त्यांच्याकडे प्रवेशद्वारात उभे राहूनच सुसंवाद साधला. एकंदरीत या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.


नेरूल येथील श्री कालीमाता मंदिरावर कारवाई करण्यासाठी न्यायालयाच्या आदेश घेऊन कारवाई पथक येणार असल्याचे भाविकांना समजले. यानंतर मंदिराच्या रक्षणासाठी २७ जून या दिवशी सकाळी मोठ्या प्रमाणावर भाविक मंदिरात एकत्र आले. कारवाई पथकाकडे असलेल्या आदेशात न्यायालयाने अनधिकृत घुमटीवर कारवाई करण्यास सांगितले होते. कारवाई पथकाला घुमटी न सापडल्याने घुमटीच्या विरोधात तक्रार करणार्‍याला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तक्रारदारही या वेळी कारवाई पथकाला ‘अनधिकृत घुमटी कुठे आहे ?’ ते सांगू शकला नाही. शेवटी असाहाय्यपणे कारवाई पथक माघारी परतले. नेरूल येथील श्री कालीमाता मंदिर अनधिकृत ठरवून ते पाडण्यासाठी यापूर्वीही एकदा प्रयत्न झाले होते; मात्र देवीच्या भक्तगणांनी संघटितपणे हा प्रयत्न हाणून पाडला होता.


हे वाचा आणि पहा –

गोवा : नेरूल येथील श्री कालीमाता मंदिर पाडण्याच्या नोटिशीवरून गावात तणावाचे वातावरण
https://sanatanprabhat.org/marathi/675139.html

संपादकीय भूमिका

हिंदूंची मंदिरे आता प्रशासनापासूनही असुरक्षित समजायची का ? मंदिर पाडण्यापूर्वी संबंधितांना त्याची कल्पना देणे आणि त्यामागील कारण सांगणे, अशी प्रशासनाची पद्धत आहे कि नाही ?