Special Trains For Maha Kumbh : महाकुंभाला येणार्‍या भाविकांसाठी १ सहस्र ३०० रेल्वेगाड्यांची सोय !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज, ९ जानेवारी (वार्ता.) – येथील महाकुंभाला येणार्‍या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने जय्यत सिद्धता केली असून २ महिन्यांत भाविकांना ने-आण करण्यासाठी एकूण १ सहस्र ३०० रेल्वेगाड्या धावणार आहेत. भाविकांना सुविधा देण्यात कोणतीही कसर न ठेवण्यासाठी रेल्वे मंडळाचे ४ सहस्र कर्मचारी झटत आहेत, अशी माहिती प्रयागराज येथील रेल्वे अधिकार्‍यांनी दिली.

प्रयागराज, नैनी, प्रयागराज चौकी आणि झुंसी येथील रेल्वे स्थानकांवरून भाविकांना ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व स्थानकांवर भाविकांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता प्रवाशांना थांबण्यासाठी रेल्वे स्थानकाजवळील ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी राज्य राखीव दल आणि रेल्वे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. भाविकांना आत-बाहेर करण्यासाठी स्थानकांवर ४ प्रवेशद्वार बनवण्यात आले आहेत.