Khalistani Nijjar Murder Case : खलिस्तानी आतंकवादी निज्जर याच्या हत्येतील चारही आरोपींची जामिनावर सुटका

पोलीस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्याने मिळाला जामीन

ओटावा (कॅनडा) – कॅनडामधील खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चारही आरेपींना कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयाने जामीन संमत केला. करण ब्रार, अमनदीप सिंह, कमलप्रीत सिंह आणि करणप्रीत सिंह अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी ११ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे. या वेळी कनिष्ठ न्यायालयात पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्याने पोलीस न्यायालयात उपस्थित नव्हते. पोलिसांची ही निष्क्रीयता पाहून सर्वोच्च न्यायालयाने चारही आरोपींना जामिनावर सोडले. (निज्जर हत्या प्रकरणात कॅनडाचे जे पोलीस तेथील स्थानिकांच्या विरोधात पुरावे सादर करू शकत नाहीत, ते भारताच्या विरोधात पुरावे काय सादर करणार ? यातून निज्जर प्रकरणात भारताच्या विरोधात आरोप करणार्‍या कॅनडाचा फोलपणा दिसून येतो ! – संपादक)

१८ जून २०२३ या दिवशी कॅनडातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर निज्जर याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. भारतात अनेक आतंकवादी कारवाया आणि हत्या प्रकरणात हवा असलेला निज्जर वर्ष १९९७ मध्ये कॅनडाला पळून गेला होता. त्याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा यांच्यामध्ये तणाव आणखी वाढला. कॅनडाने या हत्येसाठी भारताला उत्तरदायी धरल्याने दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. भारताने हत्येचा आरोप फेटाळून लावला आहे. या प्रकरणात कॅनडाने कधीही कोणताही पुरावा सादर केलेला नाही.

संपादकीय भूमिका

आता कॅनडाचे केवळ काळजीवाहू पंतप्रधान राहिलेल्या ट्रुडो यांना ही चपराकच होय ! भारतद्वेषाचे राजकारण करणार्‍या ट्रुडो यांचा वाईट काळ आता चालू झाला आहे, हेच यातून लक्षात येते !