महाराणी येसूबाई यांची समाधी ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित

महाराणी येसूबाई यांची समाधी

सातारा, ९ जानेवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांची समाधी राज्य शासनाने ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे. या महत्त्वपूर्ण विषयाची अंतिम अधिसूचना ८ जानेवारी या दिवशी राज्य शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली, अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष तथा ‘महाराणी येसूबाई फाऊंडेशन’चे संकल्पक सुहास राजेशिर्के यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांचे अभूतपूर्व योगदान आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानानंतर महाराणी येसूबाई यांनी २९ वर्षे शत्रूच्या नजरकैदेत काढली होती. ही समाधी ‘राज्य संरक्षित स्मारक’ घोषित झाल्यामुळे या परिसराच्या आणि समाधीच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.