मुंबई येथे कोविड केंद्रातील घोटाळा प्रकरणी १६ हून अधिक ठिकाणी ‘ईडी’च्‍या धाडी !

कोरोनाच्‍या काळात महापालिकेच्‍या कोविड सेंटरमध्‍ये १२ सहस्र ५०० कोटींचा घोटाळा !

मुंबई – मुंबई महापालिकेच्‍या कोविड केंद्रामधील १२ सहस्र ५०० रुपयांच्‍या घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) २१ जून या दिवशी शहरातील १६ हून अधिक ठिकाणी धाडी घातल्‍या. ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्‍हाण, मुंबई महापालिकेचे तत्‍कालीन अतिरिक्‍त आयुक्‍त संजीव जैस्‍वाल, तसेच संजय राऊत यांचे व्‍यावसायिक भागीदार सुजित पाटकर यांच्‍या घरी ‘ईडी’ने धाडी टाकल्‍या आहेत. सकाळी ८ वाजल्‍यापासून या धाडींच्‍या कारवाईला प्रारंभ झाला. विशेषकरून माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या निकटवर्तियांवर ‘ईडी’च्‍या धाडी असल्‍याची माहिती आहे.

१९ जून या दिवशी राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, ‘‘मुंबई महापालिकेत १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्‍याचा आरोप केला होता. तत्‍कालीन महाविकास आघाडीचे सरकार हे घोटाळेबाज सरकार होते, असा आरोप करत हे सरकार भ्रष्‍टाचाराचा एक-एक पैसा वसूल करेल.’’ ‘कॅग’च्‍या अहवालातून मुंबई महापालिकेचा हा घोटाळा समोर आला आहे’, असे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही म्‍हटले आहे, तसेच मुंबई महापालिकेच्‍या या घोटाळ्‍याची चौकशी करण्‍यासाठी शिंदे सरकारने विशेष अन्‍वेषण पथकाचीही (‘एस्.आय.टी.’ची.) स्‍थापना केली आहे.

नेमका आरोप काय ?

मुंबई महापालिकेने ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये सुजित पाटकर यांच्‍या ‘लाईफलाईन हॉस्‍पिटल मॅनेजमेंट सर्व्‍हिसेस’ला ५ कोविड केंद्रांचे कंत्राट दिले होते; मात्र मुंबई महापालिकेने कंत्राट दिले, त्‍या वेळी हे आस्‍थापन अस्‍तित्‍वात नव्‍हते, तसेच ती नोंदणीकृत फर्म नसल्‍याचाही आरोप आहे. या घोटाळ्‍यात १०० कोटी रुपयांचे कंत्राट चुकीच्‍या पद्धतीने दिले. कोरोनाच्‍या काळात वैद्यकीय आणीबाणीच्‍या नावाखाली खरेदीत मोठा घोटाळा झाला आहे, असा आरोप मुंबई महापालिका प्रशासनावर करण्‍यात येत आहे, तसेच कोरोनाच्‍या काळात मुंबई महापालिकेने एप्रिल २०२० मध्‍ये रेमडेसिव्‍हिरची १ कुपी १ सहस्र ५६८ रुपयांना विकत घेतली आहे, असा आरोप करण्‍यात आला आहे, तर सरकारी ‘हॉफकिन’ संस्‍थेने तेच औषध ६६८ रुपयांना विकत घेतले होते. या कालावधीत महापालिकेने २ लाख कुपी खरेदीचे कंत्राट दिले होते.

हिशोब द्यावा लागेल ! – किरीट सोमय्‍या, माजी खासदार

किरीट सोमय्या, भाजप

‘ईडी’च्‍या कारवाईवरून भाजपचे नेते किरीट सोमय्‍या म्‍हणाले की, मुंबई महापालिकेत कोविड काळात मोठा भ्रष्‍टाचार झाला आहे. आम्‍ही सातत्‍याने या भ्रष्‍टाचाराच्‍या विरोधात आवाज उठवला आहे. आता ‘ईडी’ने कारवाईस प्रारंभ केला आहे. त्‍यामुळे उद्धव ठाकरे यांनी जनतेचे पैसे कुठे व्‍यय केले, याचा हिशोब त्‍यांना द्यावाच लागेल.