हिंदु जनसंघर्ष मोर्चाचे जनआंदोलन हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत चालू ठेवूया ! – कु. प्रियांका लोणे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, संभाजीनगर

कु. प्रियांका लोणे

रामनाथ देवस्थान – गत वर्षी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत निघालेल्या हिंदु जनसंघर्ष मोर्च्यांतील हिंदूंची एकजूट बघून सर्व राजकीय पक्षांना स्वार्थ सोडून एकत्र यावे लागले. या मोर्च्यांमुळे हिंदूंमधील आत्मविश्वास वाढून हिंदुत्वावरील आघातांच्या विरोधात एकत्रित लढण्याची मानसिकता निर्माण झाली आणि याची झलक श्रीरामनवमीच्या दिवशी झालेल्या दंगलीनंतर पहायला मिळाली. एरव्ही अशा घटना घडल्यावर हिंदूंमध्ये तणाव असायचा. या वेळी मात्र हिंदूंनी तणाव न बाळगता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून श्रीरामनवमी उत्साहात साजरी केली. हा खूप मोठा सकारात्मक पालट मोर्च्यांनंतर दिसून आला. हे मोर्चे म्हणजे हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने हिंदु समाजात क्रांतीची ज्योत पेटवण्याचे माध्यम ठरत आहेत. यापुढे न थांबता आपल्याला हिंदूंवरील विविध आघातांना वाचा फोडायची आहे. जोपर्यंत मातृभूमीतून लव्ह जिहाद आणि धर्मांतराचे षड्यंत्र नष्ट होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष चालू ठेवायचा आहे. हिंदु जनसंघर्ष मोर्चे हे हिंदु राष्ट्रासाठी टाकलेले पाऊलच आहेत, असे आश्वासक उद्गार हिंदु जनजागृती समितीच्या संभाजीनगर येथील समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी काढले. त्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या चतुर्थ दिनी (१९.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होत्या.