हिंदु संस्कृतीवरील आक्रमणांना विरोध करण्यासाठी अधिवक्त्यांनी हिंदु धर्मग्रंथांचा अभ्यास करावा ! – अधिवक्ता श्रीधर पोतराजू, सर्वोच्च न्यायालय, देहली

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ तृतीय दिवस – मान्यवरांचे विचार

सध्या भारतात इंग्रजांनी आणलेले कायदे कार्यरत आहेत, जे भौतिकतेवर आधारित आहेत. याउलट हिंदु धर्मशास्त्रात वाद-विवादातून निष्कर्ष काढून अंतिम सत्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेच आपल्या न्यायव्यवस्थेचे घोषवाक्य ‘सत्यमेव जयते’ आहे, असे मी मानतो. या वाक्यातून सत्याचा शोध घेण्यासाठी नैतिक लढा देण्याची प्रेरणा मिळते. रामजन्मभूमीचा लढा हा केवळ भूमीचा लढा नसून तो श्रीरामाच्या जन्माचे सत्य शोधण्याचा लढा होता.

अधिवक्ता श्रीधर पोतराजू

स्वातंत्र्यापूर्वी भारतात न्यायालयीन कामकाजात वेद-शास्त्रे यांचा संदर्भ अभ्यासला आणि दिला जात होता; परंतु आता कायद्यांच्या पाश्‍चात्त्यीकरणामुळे तेथील संदर्भांचा वापर केला जात आहे. स्वातंत्र्यानंतर साम्यवाद्यांच्या बौद्धिक विकृतीने भारतात घट्ट आणि बळकट जाळे निर्माण केले. सध्या नव्याने येऊ पहाणारे समलैंगिक विवाहासारखे निर्णय हे हिंदूंची कौटुंबिक, सामाजिक आणि विवाह संस्था यांवरील आक्रमण आहे. अशा आक्रमणांना विरोध करण्यासाठी अधिवक्त्यांनी आपल्या धर्मग्रंथांचा आधार घ्यावा आणि त्यांचा अभ्यास करावा, असे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्रीधर पोतराजू यांनी केले.