रामनाथ देवस्थान – भारतात विविध राज्यांमध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदे बनवण्यात आले आहेत. त्यांमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे ती हिंदूंशी एकप्रकारे केलेली प्रतारणा आहे. एका राज्यात गोहत्या प्रतिबंधक कायदा असतांना त्याच्या शेजारच्या राज्यात गोहत्याबंदी कायदा नसेल, तर व्यापारी राज्याच्या सीमेपलीकडे जाऊन गोहत्या करतात. त्यामुळे गोहत्याप्रतिबंधक कायदा राज्यांच्या स्तरावर करण्यापेक्षा राष्ट्रीय स्तरावर एकच करावा. त्यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. त्यामुळे ज्या दिवशी भारत हिंदु राष्ट्र होईल, त्याच दिवशी या देशात गोहत्या संपूर्णपणे बंद होतील, असे प्रतिपादन मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या सिद्ध विद्या यांनी केले. त्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या तृतीय दिनी (१८.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होत्या.
‘गोरक्षणाचे विद्यमान त्रुटीपूर्ण कायदे’ या विषयावर बोलतांना त्या म्हणाल्या, ‘‘ज्या देशात गोपूजा ही श्रद्धा आहे, तेथे ‘एक दिवस गोहत्याबंदीसाठी लढा द्यावा लागेल’, असे कोणाला वाटले नसेल. विविध राज्यांच्या गोहत्याप्रतिबंधक कायद्यांमध्ये निरनिराळ्या त्रुटी आहेत. त्याचा लाभ व्यापारी उठवतात. काही ठिकाणी बैल आणि म्हैस यांच्या हत्यांना अनुमती देण्यात आली. या प्राण्यांचे आणि गायीचे मांस ओळखण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याने बैल आणि म्हैस यांच्या नावाखाली गोमांसाचा व्यापार चालूच असतो. काही ठिकाणी ‘अनफीट’ (शारीरिकदृष्ट्या विकलांग) गोवंशियांच्या हत्येची अनुमती आहे. त्यामुळे गोहत्या करणारे गोवंशियांना ‘अनफीट’ करण्यासाठी त्यांचा छळ करतात आणि ते ‘अनफीट’ असल्याचे प्रमाणपत्र मिळवतात. गोहत्याबंदी हा विषय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांमध्ये घेणे आवश्यक आहे.’’