श्री तुळजाभवानीदेवीची मौल्यवान नाणी गायब झाल्याचे प्रकरण
मुंबई, ६ जून (वार्ता.) – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात भाविकांनी अर्पण केलेले सोने-चांदी वितळवण्याचा निर्णय होऊन त्यासाठी एक समितीही गठित करण्यात आली आहे; मात्र श्री तुळजाभवानीदेवीचा खजिना आणि जमादारखान्यातील अतीप्राचीन, ऐतिहासिक अन् पुरातन सोन्या चांदीच्या वस्तू, मौल्यवान अलंकार, प्राचीन नाणी यांचा अपहार झाल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
या प्रकरणामध्ये राजे-महाराजेंनी देवीला अर्पण केलेली ऐतिहासिक आणि पुरातन ७१ नाणी गायब झाली आहेत. देवीचे २ चांदीचे जोड आणि माणिक गायब आहेत. या प्रकरणी चौकशी समितीने ठपका ठेवलेल्या दोषींवर अद्याप कारवाई झालेली नाही. या प्रकरणात ठपका ठेवण्यात आलेल्या दोषींवर गुन्हे नोंदवून चौकशी पूर्ण करण्याची मागणी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे यांनी केली आहे. श्री तुळजाभवानीदेवीला अर्पण आलेले सोने-चांदी वितळवणे म्हणजे अपहार प्रकरणातील गौडबंगाल लपवण्याचा तर प्रयत्न नाही ना, याची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे अपहार प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत मंदिरातील सोने-चांदी वितळवण्याच्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
श्री. सुनील घनवट यांनी म्हटले आहे की, श्री तुळजाभवानीदेवीची प्राचीन ७१ नाणी गायब झालेल्या प्रकरणात १ महंत, ३ तत्कालीन अधिकारी आणि २ धार्मिक व्यवस्थापक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक श्री. दीक्षित यांचे वर्ष २००१ मध्ये निधन झाले. त्यानंतर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता तत्कालीन सर्व अधिकार्यांनी त्यांच्या घरातून किल्ल्या आणून त्याचा वापर चालू केला. हे अवैध कृत्य वर्ष २००१ ते २००५ या कालावधीत झाले आहे. श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात भाविक श्रद्धेने दान देतात. त्या प्रत्येक दागिन्यांचा हिशोब चोख रहाणे, तसेच त्याच्या नोंदी असणे आवश्यक आहे. सोने-चांदी वितळवण्याच्या प्रक्रियेत संबंधित दोषींचा अपहार दडपण्याचा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत मंदिरातील सोने-चांदी वितळवण्यात येऊ नये.
#तुळजाभवानी
मराठी बाईटश्री तुळजापूर देवस्थान दागिने वितळवण्याच्या प्रक्रियेला विरोध ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ ची भूमिका मांडतांना ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट. pic.twitter.com/rUAOFagB7h
— dipali gite (@dipaligite13) June 6, 2023
संपादकीय भूमिकावास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदुत्वनिष्ठांवर येऊ नये. सरकराने या प्रकरणी स्वतःहून लक्ष घालून पुढील कार्यवाही करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! |
सनातन प्रभात:
श्री तुळजाभवानी देवीला अर्पण केलेले सोने आणि चांदी वितळवण्याचा निर्णय !