पुणे येथील धर्मप्रेमींचे यशस्वी योगदान !
पुणे – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ नोव्हेंबर या दिवशी असणार्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदूंना घरोघरी दीप लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुणे जिल्ह्यातील हिंदूंनी मंदिरे आणि घरे यांमध्ये दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. हिंदु राष्ट्राचा संकल्प करण्यासाठी ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ हा उपक्रम हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवून जनजागृती करण्यात आली. पुणे शहर भाग, तसेच समितीच्या हिवरे शाखा, वाघळवाडी शाखा, सोमेश्वर शाखा, पिंपळखुटे खळवडी शाखा नवलेवाडी आणि मुरुम, हडपसर, गोकवडी, तळेगाव, भोर आदी ठिकाणी मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी मंदिरात हिंदु राष्ट्रासाठी एक दीप, असे अनेक दीप लावण्यात आले. काही ठिकाणी संपूर्ण कुटुंबाने यात सहभाग घेतला. या अभियानात धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सध्या समाजात असलेली अनिष्ट प्रवृत्ती नष्ट करून लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र यावे, या उदात्त हेतूने ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ या उपक्रमातून समाजामध्ये जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात सहभागी झालेल्या हिंदु धर्मप्रेमींनी मंदिरे, घरी आदी ठिकाणी दीप प्रज्वलित करतांना ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ याविषयीचे फलक हातात धरून लोकांचे प्रबोधन केले. काही ठिकाणी सामूहिक दीपपूजन करतांना हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेण्यात आली.