सातारा येथील ‘हिंदु एकता दिंडी’त हिंदु राष्‍ट्राचा जयघोष !

हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि सामाजिक संघटना, संप्रदाय अन् गणेशोत्‍सव मंडळांचा उत्‍स्‍फूर्त सहभाग

दिंडीत सहभागी धर्मप्रेमी

सातारा, २९ मे (वार्ता.) – सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त हिंदु राष्‍ट्र-जागृती अभियानाच्‍या अंतर्गत सातारा येथे २८ मे या दिवशी ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्‍यात आले होते. या दिंडीत शहरातील समस्‍त हिंदु बांधवांनी शेकडोंच्‍या संख्‍येने सहभागी होत हिंदु राष्‍ट्राचा जयघोष केला. जिल्‍ह्यातील कराड, वाई, कोरेगाव, रहिमतपूर, वडूज तसेच सातारा आणि पंचक्रोशीतील अनेक गावांतून १ सहस्रहून अधिक धर्माभिमानी हिंदु जात, प्रांत, भाषा, संघटना, संप्रदाय, पक्ष आदी बिरुदावल्‍या बाजूला ठेऊन दिंडीत सहभागी झाले.

प्रारंभी श्री शाहू कलामंदिर येथील भव्‍य प्रांगणामध्‍ये दशनाम जुना आखाड्याचे संत पू. सोमनाथगिरी महाराज यांच्‍या शुभहस्‍ते धर्मध्‍वज पूजन करण्‍यात आले. या वेळी सनातनचे साधक श्री. बाळकृष्‍ण निकम यांनी शंखनाद केला. नंतर श्री भवानीमाता, सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पालखीचे पूजन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या वेळी अखिल भारतीय हिंदु महासभेचे महाराष्‍ट्र प्रदेश प्रमुख कार्यवाह अधिवक्‍ता दत्ताजी सणस, कार्यकारणी सदस्‍य उमेशजी गांधी, विश्‍व हिंदु परिषदेचे माजी शहरमंत्री जितेंद्र वाडेकर, विश्‍व हिंदु परिषदेचे सातारा जिल्‍हाध्‍यक्ष विजय गाढवे, विश्‍व हिंदु परिषदेच्‍या महिला आघाडीच्‍या जिल्‍हाउपाध्‍यक्षा सौ. उर्मिला पवार, आरोग्‍यसेवक पोळ आणि मोहिते, माजी नगरसेवक विजयकुमार काटवटे, उद्योजक सुरेशजी बोहरा, वेदभवन मंगल कार्यालयाचे दिनेशजी पाठक, उद्योजक रमेशजी हलगीकर, कराड येथील गोरक्षणचे श्री. सुनिल पावसकर, वडूज येथील खटाव तालुक राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे युवा संघटक प्रा. संतोष चव्‍हाण आदी मान्‍यवर उपस्‍थित होते. उपस्‍थित भाविकांनी पालखीचे भावपूर्ण दर्शन घेतले. दिंडी श्री शाहू कलामंदिरपासून पुढे राजवाडा गोलबाग, पंचमुखी गणपतीमार्गे ५०१ पाटी येथे आली. नंतर दिंडी देवीचौक येथून राजपथमार्गे मोती चौक, अजिंक्‍य गणपतीमार्गे पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर येथे आली. तेथे दिंडीचे रुपांतर सभेत झाले. या वेळी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे श्री. अक्षय शिंदे, हिंदु जनजागृती समितीच्‍या सौ. रूपा महाडिक आणि सनातन संस्‍थेचे श्री. राहुल कोल्‍हापुरे यांनी उपस्‍थितांना हिंदु संघटनाची आवश्‍यकता अधोरेखित करून संघटितपणे राष्‍ट्र आणि धर्म कार्य करण्‍याचे आवाहन केले. सनातन संस्‍थेच्‍या वतीने हिंदु राष्‍ट्र-जागृती अभियानाच्‍या अंतर्गत या हिंदू एकता दिंडीच्‍या आयोजनासह गत १ मासापासून ठिकठिकाणी मंदिर स्‍वच्‍छता, हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी देवतांना साकडे घालणे, साधना प्रवचने असे उपक्रम राबवण्‍यात आले.

धर्मध्‍वजाचे पूजन करताना दशनाम जुना आखाड्याचे पू. सोमनाथ गिरी महाराज

क्षणचित्रे

१. दिंडीमध्‍ये सहभागी लाठीकाठी, दंडसाखळी (नानचाकू) पथक समाजातील युवक आणि युवतींचे लक्ष वेधून घेत होते.

२. दिंडीत सहभागी झालेले वारकरी संप्रदायाचे टाळकरी आणि विणाधारी वारकरी, तसेच राधेच्‍या वेशभूषेत सहभागी झालेले साधक यांच्‍यामुळे वातावरण चैतन्‍यमय झाले होते.

३. दिंडी राजवाडा येथे आल्‍यावर श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्‍या पुतळ्‍याला मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पुष्‍पहार अर्पण करण्‍यात आला.

४. वाटेत अनेक धर्माभिमानी हिंदूंनी दिंडीतील धर्मध्‍वजाचे पुष्‍पहार घालून आणि पुष्‍पवृष्‍टी करून पूजन अन् स्‍वागत केले, तसेच सुवासिनी महिलांनी श्री भवानीदेवीचे औक्षणही केले.

५. राष्‍ट्रपुरुषांची वेशभूषा केलेले लहान मुलांचे पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

६. दिंडीतील महिला आणि पुरुष पारंपरिक वेशभूषा परिधान करून हातात भगवे झेंडे घेऊन घोषणा देत होते. त्‍यामुळे संपूर्ण राजपथ भगवा झाला होता.

दिंडीत सहभागी सातारा येथील हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना, संप्रदाय अन् राजकीय पक्ष

हिंदु एकता दिंडीमध्‍ये शहरातील अखिल भारतीय हिंदु महासभा, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान, वारकरी संप्रदाय, राष्‍ट्रीय वारकरी परिषद, श्री योग वेदांत सेवा समिती, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्‍था आदी हिंदुत्‍वनिष्‍ठ, सामाजिक संघटना, संप्रदाय आणि गणेशोत्‍सव मंडळाचे पदाधिकारी तसेच भाजप, शिवसेना आदी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उत्‍स्‍फूर्तपणे सहभागी झाले होते.

हिंदु एकता दिंडीसाठी साहाय्‍य करणारे धर्माभिमानी हिंदू

१. श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्‍टचे राजेंद्र चोरगे

२. मार्बल अँड सॅनिटायझेशन सोशल असोसिएशनचे अध्‍यक्ष हसमुख पटेल

३. मार्बल अँड सॅनिटायझेशन सोशल असोसिएशनचे सचिव किशोर घाडगे

४. श्रीमहालक्ष्मी मंदिर, गडकर आळी

५. पंचपाळी हौद श्री दुर्गामाता मंदिराचे विश्‍वस्‍त श्री. धनंजय देशमुख

६. श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान, सातारा

७. जिहे-कठापूर येथील प्रगतीशील शेतकरी श्री. मयुर केंजळे

८. राजवाडा, मोती चौक येथील श्री. धीरज घाडगे

९. श्री भैरवनाथ मंदिर, करंजे

१०. भारतीय जनता पक्ष व्‍यापारी आघाडीचे अध्‍यक्ष डॉ. सचिन साळुंखे

११. भारतीय जनता पक्ष व्‍यापारी आघाडीचे सदस्‍य श्री. मनीष महाडवाले

१२. जरंडेश्‍वर नाका येथील श्री मारुति मंदिराचे श्री. संभाजी कदम

१३. श्रीकाळेश्‍वरी मंदिर, कृष्‍णानगर, सातारा

१४. हितचिंतक श्री. मधुकर जाधव

श्री.छ.  प्रतापसिंह महाराज यांच्‍या पुतळ्‍यास पुष्‍पहार अर्पण करताना मान्‍यवर
धर्माध्‍वजावर पुष्‍पवृष्‍टी करताना धर्मप्रेमी
नारळ वाढवून धर्मध्‍वजाचे पूजन करताना धर्मप्रेमी

स्‍वसंरक्षण प्रात्‍यक्षिके सादर करताना हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते
छत्रपती शिवाजी महाराज तसेच अन्‍य ऐतिहासिक महापुरुषांच्‍या वेशभूषा करून दिंडीत सहभागी झालेले बालसाधक

दिंडीतील सहभागी विविध पथके