उत्तर कोरियाने ७० सहस्रांहून अधिक ख्रिस्त्यांना कारागृहात डांबले !

प्यांगयांग (उत्तर कोरिया) – उत्तर कोरियामध्ये बायबल बाळगल्याच्या प्रकरणी लोकांना जन्मठेपेपासून मृत्यूदंडापर्यंतची शिक्षा सुनावण्यात येत असल्याचा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने धार्मिक स्वातंत्र्याविषयी जारी केलेल्या अहवालात करण्यात आला आहे. वर्ष २०२२ मध्ये उत्तर कोरियाने ७० सहस्रांहून अधिक ख्रिस्ती धर्माच्या लोकांना कारागृहात टाकले होते. या अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर कोरियातील एका ख्रिस्ती कुटुंबाला केवळ त्यांच्या धर्माचे पालन केल्यामुळे आणि बायबल बाळगल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कुटुंबातील एका २ वर्षांच्या मुलाचाही या शिक्षेत समावेश आहे. हे प्रकरण वर्ष २००९ चे आहे.

उत्तर कोरियातील ५० टक्के लोक नास्तिक आहेत, २५ टक्के लोक बौद्ध आहेत आणि उर्वरित २५ टक्के ख्रिस्ती आणि इतर धर्मीय आहेत. उत्तर कोरिया साम्यवादी देश असल्याने तो ‘नास्तिकांच देश’ म्हणून ओळखला जातो.