सावरकर जयंतीनिमित्त नव्या संसद भवनाचे उद्घाटन केल्यामुळेच काही पक्षांचा उद्घाटनला विरोध ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देहली येथील महाराष्ट्र सदनात प्रथमच स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच अन्य मंत्री

मुंबई – घराणेशाहीत अडलेल्या लोकांना देशाचे कल्याण होत असल्याचे पहावत नाही. त्यांना हिंदुत्वाचे वावडे आहे. त्यामुळे संसदेच्या उद्घाटन सोहळ्याच्या मंगलमय कार्यकमात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोध झाला, असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. २८ मे या दिवशी देहली येथील महाराष्ट्र सदनामध्ये प्रथमच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे महान क्रांतीकारक होते. ते साहित्यिक आणि समाजसुधारकही होते. त्यांच्या जयंतीच्या दिवशी झालेल्या नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या ऐतिहासिक कार्यक्रमावर आक्षेप घेणे दुर्दैवी आहे. देशातील सर्व जनता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या नवीन वास्तूमध्ये लोकशाही अधिक बळकट आणि वृद्धींगत होईल. अन्य देशांची आर्थिक स्थिती डबघाईला आली असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आली, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.’’