गोवा राज्यातील महत्त्वाच्या धरणांतील पाण्याची पातळी घटल्याने पाणीटंचाईचे सावट !

गोव्यात पाणीटंचाईचे सावट !

पणजी, २५ मे (वार्ता.) – राज्यातील महत्त्वाच्या ६ पैकी ३ धरणांची पाण्याची पातळी पुष्कळ खालावल्याने आणि पावसाचे आगमन उशिरा होण्याची चिन्हे असल्याने पाण्याच्या दुर्भिक्षाचे सावट राज्यावर पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

जलस्रोत खात्याने २४ मे या दिवशी राज्यातील महत्त्वाच्या ६ धरणांची पाण्याची पातळी घोषित केली आहे. यानुसार अंजुणे धरणात केवळ ९ टक्के, पंचवाडी धरणात केवळ ५ टक्के आणि संपूर्ण दक्षिण गोवा जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या साळावली धरणात २४ टक्के पाणी शिल्लक राहिलेले आहे, तर राज्यातील उर्वरित ३ धरणांमधील पाण्याची पातळी त्या तुलनेत समाधानकारक आहे. आमठाणे धरणात ५२ टक्के, गावणे धरणात ४० टक्के आणि चापोली धरणात ४५ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. राजधानी पणजीसह तिसवाडी आणि फोंडा तालुक्यांना पाणीपुरवठा करणार्‍या ओपा पाणी प्रकल्पातील जलाशयातील पाण्याची पातळी बर्‍याच अंशी घटली आहे. यामुळे खांडेपार नदीवरील शेवटचे २ शिंगणेव्हाळ आणि आंबे येथील बंधारेही उघडण्याची वेळ आली आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून सध्या खाणपिठांतील पाणी उपसण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. ओपा पाणी प्रकल्पाची पातळी २३ मे या दिवशी २.८९ मीटरवर पोचली होती. गतवर्षी मे मासाच्या चौथ्या आठवड्यापर्यंत हीच पातळी ४.२५ मीटर एवढी समाधानकारक होती. हवामान खात्यानुसार यंदा पावसाचे आगमन ४ दिवसांनी लांबणार आहे. केरळमध्ये ४ जूनला, तर गोव्यात ८ किंवा ९ जून या दिवशी  पावसाचे आगमन होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.