छत्रपती संभाजीनगर येथील सैनिक सैन्यातून १३ वर्षांपासून बेपत्ता !

मुलाची माहिती मिळण्यासाठी आई-वडिलांचे उपोषण !

छत्रपती संभाजीनगर – सैन्यातून वर्ष २०१० पासून बेपत्ता झालेले सैनिक रवींद्र भागवत पाटील यांचा शोध घेऊन त्याला सोपवावे, अशी मागणी हरवलेल्या सैनिकाचे माता-पिता यांनी केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे. सैनिकाचे वडील भागवत पाटील आणि आई बेबीताई पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. (बेपत्ता मुलाची नेमकेपणाने माहिती आई-वडिलांना का दिली जात नाही ? त्यासाठी उपोषण करणे, निवेदन देणे का करावे लागते ? – संपादक)

रवींद्र पाटील वर्ष २००५ मध्ये सैन्यात भरती झाले होते. देशसेवा करत असतांना वर्ष २०१० पासून त्यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकलेला नाही. या संबंधी सैन्य कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. नंदनवन कॉलनी येथील सैनिक अधिकारी यांनी मागील २ वर्षांपासून दिशाभूल केली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मुलगा सापडत नाही का ? असे विचारले असता ‘तुम्हाला निवृत्तीवेतन देऊ’, असे सांगितले जात आहे.

अशिक्षित आई-वडिलांना न्याय मिळावा !

सैन्यात भरती झालेल्या मुलाला वर्ष २००५ ते २०१० या कालावधीत आई-वडील भेटायचे. एकदा वडील सैन्यात युनिटला भेटण्यास गेले, तेव्हा त्यांना ३ दिवस थांबवून घेतले. नंतर घरी पाठवले. सैनिक कल्याण अधिकार्‍यांनी आई-वडिलांचे समाधान करावे. यासंबंधी स्पष्टता व्हावी, असे भाजप सैनिक आघाडीचे सचिव अशोक हांगे यांनी सांगितले.