सातारा, २५ मे (वार्ता.) – १५ व्या वित्त आयोगाचा १०० टक्के निधी १ मासात व्यय व्हावा. यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी कटाक्षाने प्रयत्न करावेत, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले आहे. केंद्र सरकारकडून १५ व्या वित्त आयोगातील ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. गावाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी हा निधी महत्त्वाचा आहे. यासाठी गावातील सर्व घटकांना सहभागी करून घेऊन स्थानिक आवश्यकता आणि शासनाची ध्येय-धोरणे विचारात घेऊन ग्रामपंचायत विकास आराखडा सिद्ध करण्यात आला आहे; परंतु निधी उपलब्ध असतांनाही आराखड्यातील कामांवर कार्यवाही करण्यामध्ये ग्रामपंचायती सक्षम नाहीत. २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षातील निधी शिल्लक आहे. ही गोष्ट गावाच्या विकासासाठी अयोग्य आहे. त्यामुळे गावातील सरपंचांनी पुढाकार घेऊन सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करून सर्व निधी येत्या मासात व्यय करावा.