‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ हे चित्र आम्ही पालटणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी जिल्ह्यातून ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा शुभारंभ !

 

रत्नागिरी – ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ हे चित्र आम्ही पालटणार आहोत. आम्ही २४ घंटे काम करणारे कार्यकर्ते आहोत. मुख्यमंत्री असलो, तरी मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्याला साहाय्य करत आहेत.  या योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील किमान १ लाख लाभार्थ्यांना शासन योजनेचा लाभ प्रत्यक्ष स्वरूपात देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ‘शासन आपल्या दारी’ या लोकाभिमुख योजनेच्या शुभारंभाच्या वेळी ते बोलत होते.

येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही लाभार्थ्यांना प्रमाणपत्रेही देण्यात आली.

जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार सदानंद चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी मान्यवरांसह व्यासपिठावर मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले,

१. नागरिकांना सरकारी योजना आणि कागदपत्रे एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देणे हा ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश आहे. यासाठी सुमारे ७५ सहस्र स्थानिकांना लाभ वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासनांना त्यांच्या संबंधित भागात २ दिवसांची शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

२. या उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेतांना नागरिकांना येणार्‍या अडचणी दूर करणे हा आहे. बर्‍याचदा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात, त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.

३. या योजनेच्या अंतर्गत ४० ते ५० कोटी रुपयाचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घराच्या जवळ लाभ देण्याचे काम सरकार करत आहे.

४. घरात बसूम काम करणे आणि रस्त्यावर फिरून काम करणे, यातील भेद महाराष्ट्रातील जनतेने ओळखला आहे.

५. आम्ही कार्यपद्धतीमुळे विरोधी पक्ष गोंधळला आहे. आमच्या कामांमुळे विरोधकांचा दम निघून गेला आहे; म्हणून ते बेदम बोलत आहे. त्यांना बोलत राहूद्या, आम्ही काम करत राहू.

६. अधिकारी वर्ग आता गावोगावी जाऊ लागलेत. तेथील लोकांना योजनेचा लाभ कसा मिळेल ? हे ते पहात आहेत. सरकारने चालू केलेल्या योजना लोकांपर्यंत पोचवायच्या असतील, तर अधिकारी हे महत्त्वाचा दुवा ठरतील.