स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीच्या निमित्ताने विचार जागरण सप्ताह !
सांगली, २४ मे (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगतांना ‘घरवापसी आणि शुद्धीकरण चळवळ’ राबवली. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात शेवटी दाखवल्याप्रमाणे पालकांनी राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे संस्कार न केल्यामुळे सध्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्र आणि धर्म यांचे विचार आपण पुढील पिढीला दिले पाहिजेत, असे आवाहन कोल्हापूर येथील कणेरी मठाचे प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त ‘पर्यटन संचनालय, महाराष्ट्र शासन आणि विवेक व्यासपीठ आयोजित ‘वीरभूमी परिक्रमा’ विचार जागरण सप्ताह २१ ते २८ मे या कालावधीत होत आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान निर्मित ‘उत्सव तेजाचा स्वातंत्र्यवीरांचा’ हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान मैदान, विश्रामबाग येथे २३ मेया दिवशी पार पडला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ म्हणाले, ‘‘नवीन पिढीस स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ओळख आणि जुन्या पिढीस त्यांच्या विचारांची उजळणी होण्यासाठी हा कार्यक्रम आहे.’’ या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. विलास चौथाई, माजी आमदार श्री. नितीनराजे शिंदे, सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक श्री. लक्ष्मण नवलाई, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे श्री. विजय नामजोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन विवेक व्यासपीठ, सांगलीचे श्री. सुहास कुलकर्णी यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या कलाकारांनी गायन, पोवाडा, नाट्यप्रसंग आणि नृत्याविष्कारातून सादर केलेली ही कलाकृती पाहून प्रेक्षक मंत्रमुद्ध झाले. या कलाकृतीतून स्वातंत्र्यवीरांच्या जीवनातील अनेक प्रसंग लोकांच्या डोळ्यांसमोर उभे राहिले.
‘स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा…त्या तिघी’ या कार्यक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद !२२ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजता ‘स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा…त्या तिघी’ हा कार्यक्रम भावे नाट्यगृह येथे पार पडला. अभिनेत्री अपर्णा चोथे यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमात सावरकर घराण्यातील यशोदाबाई गणेश सावरकर, यमुनाबाई विनायक सावरकर आणि शांताबाई नारायण सावरकर या तिघींनी काय हालअपेष्टा सोसल्या ? ते पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या कार्यक्रमासाठी सावरकरप्रेमींचा प्रतिसाद इतक्या मोठ्या प्रमाणात होता की, नाट्यगृह पूर्ण भरून अनेक जण बाहेर उभे होते. |