मूळ समस्या आणि अंतिम उपाय !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

कथावाचक पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी सागर (मध्यप्रदेश) येथे बोलतांना मंदिरांमधून धर्मशिक्षण देण्याविषयी उद्गार काढले. ‘मंदिरांमधून सनातन म्हणजे काय ? हिंदु धर्म म्हणजे काय ? हे शिकवले जात नाही, तोपर्यंत धर्मांतरे होत रहातील’, असे ते म्हणाले. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री बर्‍याच वेळा हिंदूंच्या दृष्टीने अतिशय सत्य आणि नेमकेपणाने विधाने करतात. त्यांनी केलेली विधाने ही हिंदूंच्या मूळ समस्या आणि त्यांवरील उपाययोजना असतात. त्यामुळेच सध्या खर्‍या धर्मापासून दूर गेलेले बहुसंख्य हिंदू, श्रद्धावान सनातनी हिंदूंना सतत टोकणारी माध्यमे, पुरोगामी हिंदुद्वेष्टे आणि हिंदूंना नष्ट करण्याचा विडा उचललेले अन्य धर्मीय यांच्यासाठी ते चर्चेचा विषय बनतात. ‘हिंदूंची सद्यःस्थिती दयनीय का आहे ?’, याविषयीची उत्तरे त्यांच्या विधानांमधून बरेचदा मिळतात. आताही वरील विधान करून त्यांनी हिंदूंच्या नेमक्या समस्येवर बोट ठेवले आहे. संपूर्ण भारतात सर्वत्रच हिंदूंची होणारी प्रचंड धर्मांतरे ही आमिषे दाखवून किंवा फसवून या २ कारणांमुळे होत असली, तरी हिंदूंना मूलतः त्यांच्या सनातनी, म्हणजेच वैदिक हिंदु धर्माचे शिक्षण असेल, तर ते आमिषालाही बळी पडणार नाहीत आणि फसवलेही जाणार नाहीत. ‘हिंदूंना धर्मशिक्षित करणे’, हेच धर्मांतरे रोखण्यामागील गमक आहे. तेच पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी नेमकेपणाने हेरले आहे. धर्म आणि अध्यात्म यांची जाण असणारा अन् स्वतः साधना करणाराच अशा प्रकारे हिंदूंच्या समस्यांवरील उत्तरे मुळातून देऊ शकतो. ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना त्यांनी थेट श्रीकृष्ण वचनाचाच दाखला दिला आहे. ‘दुसर्‍या धर्माच्या विचारांपेक्षा स्वधर्मातील मरणही चांगले’, असे सांगून त्यांनी धर्मांतराला बळी पडणार्‍यांना ‘धर्मशास्त्र’ समजावून सांगितले आहे. धीरेंद्रकृष्ण शास्त्री मधून मधून ‘घरवापसी’चे उपक्रमही त्यांच्या कार्यक्रमात जाहीररित्या राबवून धर्मांतर करणार्‍यांना अक्षरशः उघडे पाडतात; परंतु या वेळी त्यांनी धर्मांतरे रोखण्याचा थेट उपाय सांगून हिंदूंना दिशा दिली आहे. ही दिशा पकडून पुढे जाणे आवश्यक आहे. राज्यकर्तेही त्यांनी दिलेली दिशा घेऊन पुढे गेले, तर खर्‍या अर्थाने ‘राजसत्ता धर्मसत्तेला मान देते’, असे होईल आणि त्यामुळे येणार्‍या दशकांत धर्मांतराची समस्याही हळूहळू मुळापासून नष्ट होईल; कारण धर्मशिक्षणाने निर्माण होणारा धर्माभिमानच अगदी गरिबातील गरीब हिंदूला अन् लव्ह जिहादला बळी पडणार्‍या प्रत्येक मुलीला धर्मांतरापासून वाचवणार आहे. धर्मशिक्षण देण्याची सोय सध्या शैक्षणिक अभ्यासक्रमात नसल्याने अर्थात्च सात्त्विक स्थळ असलेली मंदिरेच ते देण्याचे उत्तम माध्यम आहेत. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेली अनेक वर्षे हेच सूत्र समाजापर्यंत पोचवण्यासाठी विविध उपक्रम अन् मंदिरांमधून धर्मशिक्षणाचे फलक लावून समाजाला धर्माचरणी बनवण्यासाठी प्रयत्नरत आहे.

हिंदु राष्ट्राचे सूत्र मांडण्याचे धैर्य !

आज सर्व सत्ता हाताशी असणारे राज्यकर्तेही ‘हिंदु राष्ट्रा’चे सूत्र मांडू शकत नाहीत; कारण निधर्मीपणाचा कुसंस्कार भारतियांवर अतीतीव्रतेने करण्यात आला आहे. हिंदूंनाही ‘निधर्मी असणे हेच योग्य आहे’, अशी शिकवण दिली गेल्याने त्यांच्या सर्व स्तरांवरील प्रचंड आघातांविषयी ते अनेक दशके निद्रिस्त राहिले. ‘हिंदूंची धर्मांतरे’ हेही त्याचेच फलित आहे. आता ‘हिंदु राष्ट्र’ याविषयी चर्चा चालू झाली, तरी त्याची  ठामपणे, अतिशय आत्मविश्वासाने आणि संपूर्ण निश्चयपूर्वक लक्षावधी भक्तांसमोर मागणी करण्याचे धैर्य पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यात असल्याने ते निश्चितच गौरवाला पात्र आहेत. ते लक्षावधी हिंदूंना हिंदु राष्ट्राचे महत्त्व समजावून सांगत असल्यामुळे अर्थातच ईश्वरी कृपेला ते पात्र ठरणार आहेत. हे धैर्य त्यांच्यात धर्मशिक्षण आणि साधना यांच्यामुळे निर्माण झालेल्या आत्मबलाने आले आहे. हिंदु राष्ट्राचे सूत्र उचलल्यामुळे आणि ‘घरवापसी’च्या उपक्रमामुळे कट्टर मुसलमान त्यांच्यावर चिडले आहेत. त्यांच्या वरील मागणीमुळे ‘जमिएत उलेमा हिंद’सारख्या कट्टर संघटनेने नेहमीप्रमाणे चोराच्या उलट्या बोंबा मारल्या की, ‘हिंदु राष्ट्राची मागणी होऊ शकते, तर इस्लामी राष्ट्राची आणि खलिस्तानची मागणी करणारे गद्दार कसे ?’ त्यामुळे ‘आपल्या मूळच्या हिंदु राष्ट्रात उरफाटी इस्लामी राष्ट्राची मागणी करणार्‍या ‘गद्दारां’ना तोंड देण्यासाठी ‘बाबा बागेश्वरधाम’ यांच्यासारखेच सामर्थ्यवान आणि धैर्यवान नेतृत्व हवे’, असे विचार हिंदूंच्या मनात आल्यास चूक ते काय ? आज चित्रपट अभिनेते राजकारणी यांनाही गोळा करता येत नाही एवढी गर्दी त्यांच्यासाठी जमते, ते त्यांच्या देव आणि धर्म यांच्यावरील अतुट श्रद्धेमुळेच ! हेच ‘देव आणि धर्म यांचे शिक्षण सर्वांना मिळायला हवे’, ही त्यांची तळमळ आहे. त्यांच्याप्रमाणेच ‘नसानसात मुरलेला धर्माभिमान आणि सनातन धर्मावरील अतुट भक्ती हिंदूंमध्ये निर्माण व्हावी’, अशी त्यांची इच्छा आहे. मुंबई येथील त्यांच्या प्रवचनात त्यांनी स्पष्टच म्हटले होते, ‘संपूर्ण भारताला राममय करणे, हेच माझे अंतिम उद्दिष्ट आहे.’ ते स्वतः वैदिक अध्ययन आणि संस्कृत यांच्या प्रसारासाठी एका गुरुकुलाची स्थापना करत आहेत, असेही त्यांनी घोषित केले आहे. ‘हिंदु राष्ट्र एका कल्पवृक्षाप्रमाणे आहे. याची सावली सर्वांना (सर्व धर्मांना) मिळत राहील. जातीयवाद नष्ट होईल. सामाजिक सौहार्द निर्माण होईल. भारताच्या राज्यघटनेत १२५ वेळा पालट करण्यात आले आहेत, तर ‘हिंदु राष्ट्रा’साठी आणखी एकदा तो केला जाऊ शकतो.’, असे शास्त्री यांनी सांगूनच टाकले आहे. ‘भारत हिंदु राष्ट्र होईलच. आपल्या येणार्‍या पिढ्यांसाठी जागे व्हा. तुम्ही मला साथ (समर्थन) द्या, मी तुम्हाला हिंदु राष्ट्र देईन !’, अशी नेताजी बोस यांच्यासारखी घोषणा करण्याचे धैर्य असणारे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना आता शासन आणि हिंदू यांनी खरोखरच साथ दिली पाहिजे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे शासन आणि हिंदू यांनी धर्मशिक्षणाचा प्रसार केल्यास खरोखरच हिंदु राष्ट्र दूर नाही !

हिंदूंच्या समस्यांचे मूलभूत कारण आणि उपाय सांगणारे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री गौरवास्पद !