स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह !
रत्नागिरी – रांगोळीच्या विविध छटांतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग रांगोळीकारांनी साकारले. या रंगावलीतून ‘साक्षात् वीर सावरकर प्रत्यक्ष उभे राहिलेत’, असा भास होतोय, असे गौरवोद्गार श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र उपाख्य मुन्नाशेठ सुर्वे यांनी काढले. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताहा’निमित्त पतित पावन मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील विविध भागांसह रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतित पावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकर विचार जागरण सप्ताह २१ ते २८ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यात दुसर्या दिवशी आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सकाळी १० ते ५ या वेळेत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. तर संध्याकाळी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे अध्यक्ष आनंद मराठे, श्री भागोजीशेठ कीर ट्रस्टचे विश्वस्त अधिवक्ता विनय आंबुलकर, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र साळवी, राजन फाळके, गौरांग आगाशे, मनोज पाटणकर, पतित पावन संस्थेचे मंदार खेडेकर, परीक्षक कला शिक्षक, चित्रकार नीलेश पावसकर, प्रसिद्ध रांगोळीकर राजू भातडे, रांगोळीकार प्रशांत राजीवले, कलाकार श्रीकांत ढालकर, समन्वयक रवींद्र भोवड, रांगोळी स्पर्धा संयोजक अनघा निकम-मगदुम, सहसंयोजक मंगेश मोभारकर, तनया शिवलकर, केशव भट आदी उपस्थित होते.
या स्पर्धेचा निकाल लवकरच घोषित करण्यात येणार असून २८ मे या दिवशी वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पतित पावन मंदिरात आयोजित कार्यक्रमात याचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. हे रंगावली प्रदर्शन २८ मेपर्यंत सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले रहाणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.