सातारा जिल्ह्यातील ‘अटल भूजल’ योजना केवळ कागदावरच ?

सातारा, २१ मे (वार्ता.) – जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला भरपूर शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी ‘अटल भूजल’ योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली; मात्र या योजनेकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असून ही योजना केवळ कागदावरच आहे का ? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त या योजनेची घोषणा केली होती. ग्रामीण भागातील भूजल पातळी वाढवून पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करणे, हा या योजनेमागील उद्देश होता. ग्रामपंचायत पातळीवर संवादात्मक कार्यक्रमातून जनजागृती करण्यात येणार होती; मात्र यावर पुढे काहीच होऊ शकले नाही. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील ११४ गावांचा या योजनेत समावेश आहे. त्यातील माण तालुक्यातील ३८, खटाव तालुक्यातील ३२, वाई तालुक्यातील ४१ आणि महाबळेश्वर तालुक्यातील १ गाव समाविष्ट आहे; मात्र अद्याप माण तालुक्यातील एकाही गावात या योजनेवर काम चालू झालेले नाही. त्यामुळे ‘अटल भूजल’ योजना केवळ कागदावरच असून ती सामान्य जनतेपर्यंत पोचलेलीच नाही, असा आरोप केला जात आहे.

संपादकीय भूमिका

हे आहे सरकारी काम ! असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? प्रशासनाने चालू केलेल्या सर्व योजना योग्य पद्धतीने कार्यान्वित आहेत ना ? याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे आवश्यकतेनुसार सुधारणा कराव्यात, हीच अपेक्षा !