छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकार्‍यांचे स्थानांतर !

१. छत्रपती संभाजीनगर येथील दंगलीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्ष नेत्यांचे पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप

संभाजीनगर येथून स्थानांतरित करण्यात आलेले पोलीस आयुक्त श्री. निखिल गुप्ता

छत्रपती संभाजीनगर येथे दंगल झाल्यानंतर तेथील पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे स्थानांतर झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. न्यायिक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांचे स्थानांतर हा नित्याचा भाग असतो. त्यातही महाराष्ट्रातील स्थानांतराच्या कायद्यानुसार एप्रिल-मे या मासांमध्ये अशी स्थानांतरे अपेक्षित असतात; मात्र या वेळी त्याला एक वेगळा रंग असावा, असे वाटते. धर्मांधांनी रामनवमीच्या पूर्वसंध्येला येथील किराडपुरामध्ये मोठी दंगल घडवली. त्यांनी पोलिसांवर जीवघेणी आक्रमणे केली. त्यात पोलिसांची १७ वाहने आणि अन्य ३ खासगी वाहने जाळण्यात आली. या दंगलीनंतर महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी ‘अवैध धंदे करणारे, गुटखा विक्रेते, मद्यविक्रेते, मटका चालवणारे, अवैध मुरूम उत्खनन करणारे, अवैध गॅस भरणारे, तस्कर हे पोलिसांच्या आशीर्वादाने व्यवसाय करतात’, असे आरोप केले. या वेळी त्यांनी कोणते पोलीस ठाणे किती हप्ता घेते, याचीही माहिती दिली.

२. छत्रपती संभाजीनगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर स्थिती !

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

आश्चर्य म्हणजे दंगल झाल्यानंतर सामान्यतः पोलिसांचे स्थानांतर होत नाही; कारण कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आणणे आवश्यक असते. तसेच उत्तरदायी नेत्यांनी गंभीर आरोप केल्यानंतर सामान्यतः शहानिशा झाल्याखेरीज पोलिसांचे स्थानांतर होत नाही. येथे मात्र वेगळाच अनुभव आला. संभाजीनगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था सोडाच, महिलांवरील अत्याचारातही पुष्कळ वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या महिलांवर आक्रमणे, बलात्कार आणि लैंगिक अत्याचार होतात. विमानतळाजवळ विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाला; पण अद्याप आरोपी सापडले नाहीत. दिवसाढवळ्या मंगळसूत्रांच्या चोर्‍या, घरातील लूटमार आणि घरांवर दरोडे यांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. धर्मांधांचा उद्दामपणा, आक्रमकता आणि कायदा हातात घेण्याची वृत्ती फोफावली आहे. काही मासांपूर्वी धर्मांध रिक्शावाला अश्लील बोलल्यामुळे एका मुलीने चालत्या रिक्शातून उडी मारली. एक मुसलमान मुलगी हिंदु मित्रासमवेत मकबरा (समाधीस्थान) पहायला गेली होती; म्हणून धर्मांधांनी तिच्यावर आक्रमण केले. यासंदर्भात ‘प्रेमाला धर्म नसतो’, अशी पोपटपंची करणारे गप्प आहेत. त्याच्या दुसर्‍याच दिवशी ‘स्पा सेंटर’मध्ये काम करणारी मुसलमान मुलगी हिंदु मालकाशी कामानिमित्त फिरतांना दिसली. त्यावरून धर्मांधांनी तिला दमदाटी केली. त्यानंतर तिला बलपूर्वक मुसलमानबहुल भागात नेण्यात आले. तेथे तिला मारून टाकण्याच्या धमक्या देण्यात आल्या. ‘स्पा सेंटर’च्या व्यवस्थापकाने दूरभाष केल्यावर पोलीस आले. पोलीस आल्यावर धर्मांध पसार झाले. या ठिकाणी ‘धर्मांधांना नोकर्‍या देऊन आपले आयुष्य कशाला धोक्यात घालायचे ?’, असे म्हणावेसे वाटते.

३. दंगल करणार्‍या धर्मांधांना पोलीस आणि राजकारणी यांच्याकडून इफ्तारच्या मेजवान्या !

पोलीस आयुक्तांचे स्थानांतर झाल्यानिमित्त त्यांची ‘जिलेबी तुला’ करण्यात आली. वरिष्ठांना त्यांच्या सहकार्‍यांनी कसा निरोप द्यावा, हा त्यांचा विषय आहे; पण येथे ‘हलवायाच्या घरावर तुळशीपत्र’ अशी एक जुनी म्हण आठवते. ज्या धर्मांधांनी शहरात दंगल केली आणि पोलिसांवर प्राणघातक आक्रमणे केली, त्यांना काही दिवसांतच पोलीस आणि राजकारणी यांनी इफ्तारच्या मेजवान्या दिल्या. यासारखे दुर्दैव दुसरे काय आहे ?सकाळ-सायंकाळ राज्यघटना, न्याय, बंधूता आणि समानता यांचे गोडवे गाणारे हे बघतात ना ?

हिंदु सणांच्या वेळी पोलीस बंदोबस्त लावला जातो, तेव्हा बंदोबस्तावरील पोलीस हे देवदर्शनाला आलेले महिला, वृद्ध आणि लहान मुले यांना शांतपणे देवदर्शनही घेऊ देत नाहीत. देवाच्या पायाशी डोके टेकवत नाही, तोच पोलीस त्यांना हाताला धरून दूर ढकलतात. धर्मांधांनी पोलिसांवर कितीही आक्रमणे केली, तरी त्यांच्यासाठी इफ्तार मेजवान्या चालूच असतात. या सर्व प्रकरणात सरकारने स्पष्टीकरण मागावे, असे जनसामान्यांना वाटते. प्रशासनाला जर कारभार पारदर्शक करायचा आहे, तर मग ही स्थानांतरे का झाली ? हे जनतेला समजून घेण्याचा अधिकार आहे. हिंदूंना पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून मिळत असलेली वागणूक देशात ‘हिंदु राष्ट्र’ अनिवार्य करते.’

श्रीकृष्णार्पणमस्तु !

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (३०.४.२०२३)