हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍याला कांदोळी (म्हापसा – गोवा) येथे जमावाने चोपले

पोटा (केरळ) येथील ‘डिव्हाईन रिट्रीट सेंटर’

म्हापसा, १७ मे (वार्ता.) – रोमन ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला नारायण इंगळे याने पोटा (केरळ) येथील ‘डिव्हाईन रिट्रीट सेंटर’मध्ये २६ मे या दिवशी असलेल्या ‘रिट्रीट’ कार्यक्रमाच्या आयोजनाचा फलक कांदोळी येथील चर्चजवळ लावला होता. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सुमारे ५० ते ६० सदस्य असलेल्या अज्ञात जमावाने हिंदूंचे धर्मांतर करण्याचा हा प्रयत्न असल्याच्या संशयावरून नारायण इंगळे याला कांदोळी येथे घटनास्थळी बोलावून चोप दिला. १४ मे या दिवशी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस तक्रार झालेली नाही. नारायण इंगळे याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार त्याने कांदोळी येथे एका चर्चजवळ चर्चच्या फादरची अनुज्ञप्ती घेऊन पोटा (केरळ) येथील ‘डिव्हाईन रिट्रीट सेंटर’मध्ये २६ मे या दिवशी असलेल्या ‘रिट्रीट’ कार्यक्रमाचा एक फलक लावून त्यावर संपर्कासाठी स्वत:चा भ्रमणभाष क्रमांक लिहिला. असाच फलक त्याने कांदोळी येथे एका यार्डजवळ लावला.

‘ज्यांना इच्छा आहे त्यांनी पोटा येथील ‘रिट्रीट’ कार्यक्रमात सहभागी व्हावे’, असे आवाहन फलकाद्वारे करण्यात आले होते. यानंतर नारायण इंगळे याला अज्ञाताने बांधकाम कंत्राट देत असल्याचे सांगून कांदोळी येथे चर्चच्या ठिकाणी बोलावले. नारायण इंगळे चर्चच्या ठिकाणी आल्यानंतर त्याला सुमारे ५० ते ६० जणांच्या जमावाने घेराव घातला आणि त्यांच्यावर ‘फलक कोणत्या उद्देशाने लावले ?’ या आशयाच्या प्रश्नांचा भडिमार केला. हिंदूंना आमीष दाखवत असल्याच्या आरोपावरून नारायण इंगळे याला खडसावले. नारायण इंगळे याने या वेळी ‘मी काही स्थानिक युवकांना ओळखतो आणि त्यांचा फलकाला आक्षेप असेल, तर तो मी काढतो’, असे सांगितले; मात्र यानंतर जमावातील काही जण आक्रमक झाले आणि काहींनी त्याला मारले. तो हिंदूंचे धर्मांतर करत असल्याचा जमावाचा आरोप होता. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी नारायण इंगळे याला सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात नेले. घटनेविषयी एका इंग्रजी वृत्तपत्राला अधिक माहिती देतांना नारायण इंगळे म्हणाला की, मी कोणताही गुन्हा केलेला नसतांना मला जमावाने मारले याचे मला पुष्कळ वाईट वाटले. मी कळंगुट पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना सांगितले की, मी जमावातील सदस्यांना माफ केले आहे आणि मला त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवायची नाही.

पोलिसांनी मारहाण करणार्‍यांवर कारवाई न केल्यास न्यायालयात जाणार ! – काँग्रेसचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस

या घटनेविषयी काँग्रेसचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस म्हणाले, ‘‘गोव्यात अशा घटना पूर्वी घडल्या नाहीत आणि यापुढेही अशा घटना येथे घडू नयेत. काही धर्मांध लोक गोव्याची प्रतिमा मलीन करत आहेत आणि अशांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

अशा घटना धार्मिक सलोखा बिघडवत असल्याने मुख्यमंत्र्यांनी याला उत्तरदायी असलेल्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. या प्रकरणी आरोपीवर तक्रार न करण्यासाठी दबाव आणण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई न केल्यास न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात जाणार आहे.’’

संपादकीय भूमिका

‘डिव्हाईन रिट्रीट’ची जाहिरातबाजी म्हणजे लोकांना रोग बरे करत असल्याचे आमीष दाखवणेच नाही का ? ख्रिस्त्यांना या ‘डिव्हाईन रिट्रीट’चा लाभ होत असेल, तर त्यांनी त्यांच्याच धर्मातील लोकांना बोलवावे. सार्वजनिक ठिकाणी फलक लावणे; म्हणजे अन्य धर्मियांना आमीष दाखवून आपल्या धर्मात ओढणे !