म्हादईचे पाणी कर्नाटकला कदापि वळवू देणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

म्हादई जलवाटप तंटा

पणजी, १५ मे (वार्ता.) – म्हादई ही आमची माता आहे. कुठल्याही परिस्थितीत गोव्याच्या हक्काचे म्हादईचे पाणी कर्नाटकला वळवू देणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे गोवा सरकार म्हादई कशी वाचवते, याकडे आता सर्वांचे लक्ष रहाणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘म्हादईविषयी गोव्याचा न्यायालयीन लढा चालू आहे. आम्ही गोव्याच्या हक्काचे पाणी कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकला वळवू न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. अन्य कुठल्याही सरकारने म्हादईच्या रक्षणासाठी अशा प्रकारे पावले उचललेली नाहीत. गोवा सरकार म्हादईसंबंधीच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आम्ही बेंगळुरू येथील विभागीय समितीकडे आणि नवी देहली येथे केंद्राकडे म्हादईवरील बांधकामासाठी वन अनुज्ञप्ती न देण्यासाठी प्रखरपणे आमची बाजू मांडली आहे. गोव्याचे मुख्य वन्यजीव वॉर्डन यांनी कर्नाटकला नोटीस बजावून म्हादईवरील सर्व प्रकारची कामे बंद करण्यास सांगितले आहे. आतापर्यंत सर्वाेच्च न्यायालयाचे सर्व निकाल आमच्या बाजूने आहेत आणि याद्वारे कर्नाटकला म्हादईवर पर्यावरण नियमानुसार कोणत्याही प्रकारचे काम करता येणार नाही.’’

‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा