लोकसंख्यावाढीसाठी चीन प्रयत्नशील !

युवा वर्गाला लग्न करणे आणि मुले जन्माला घालणे, यांसाठी प्रोत्साहित करणार !

बीजिंग – एकेकाळी १ मूल जन्माला घालण्याची सक्ती असणारा चीन आता लोकसंख्यावाढीसाठी प्रयत्नशील आहे. चीन सरकारकडून युवा वर्गाला लग्न करणे आणि मुले जन्माला घालणे, यांसाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. यासाठी चीन सरकारच्या ‘परिवार नियोजन संघा’कडून विविध योजना राबवण्यात येणार आहेत. ‘परिवार नियोजन संघा’कडेच सरकारच्या १ मूल जन्माला घालण्याच्या सक्तीची कार्यवाही करण्याचे दायित्व होते. आता नव्या योजनेच्या अंतर्गत युवा वर्गाला लग्न करण्यासाठी आणि योग्य वयात मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. मुलांच्या संगोपनाच्या दायित्वाचे भानही युवा वर्गाला करून देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे, तर अधिकाधिक युवा वर्गाने लग्न करावे, यासाठी चीन सरकार हुंडा पद्धत आणि जुन्या प्रथा-परंपरा यांवर निर्बंधही आणणार आहे.

यापूर्वीही चीनने लोकसंख्यावाढीसाठी करामध्ये सुट देणे, घरकुल योजनेत सबसिडी देणे आणि तिसरे मूल जन्माला घातल्यास त्याला निःशुल्क शिक्षण देणे, अशा उपाययोजना राबवल्या होत्या. चीनमध्ये वर्ष १९८० ते २०१५ या कालावधीत ‘एक मूल’ धोरण अत्यंत कठोरपणे राबवण्यात आले.