मुंबई, १० मे (वार्ता.) – महाराष्ट्रात ‘फूटबॉल’ या खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी राज्यशासनाने जर्मनीमधील ‘फूटबॉल क्लब बायर्न’ या जगप्रसिद्ध संस्थेसमवेत सहकार्य करार केला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील १४ वर्षांखालील २० विद्यार्थी जर्मनी येथे जाऊन फूटबॉलचे अद्ययावत प्रशिक्षण घेणार आहेत.
या दौर्यामध्ये क्रीडामंत्री गिरीश महाजन, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, उपसचिव सुनील हंजे आणि क्रीडा आयुक्त सुहास दिवसे हेही सहभागी असणार आहेत. जर्मनी येथील फूटबॉल खेळाच्या दृष्टीने जर्मनीतील पायाभूत सुविधा, क्रीडा संकुल व्यवस्थापन, खेळाडूंची निवड, अत्याधुनिक प्रशिक्षण, क्रीडा विज्ञानाचा अभ्यास, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडाक्षेत्रात पायाभूत सुविधांची निर्मिती, अत्याधुनिक प्रशिक्षण, क्रीडासंकुलांचे व्यवस्थापन आदींचा अभ्यास या दौर्यामध्ये केला जाणार आहे.
स्वीत्झर्लंडला महाराष्ट्र देणार योग आणि मल्लखांब यांचे धडे !
स्वीत्झर्लंड येथे योग आणि मल्लखांब यांचा प्रसार करण्यासाठी तेथील सरकारने महाराष्ट्र शासनाकडे साहाय्य मागितले होते. या अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून स्वीत्झर्लंड येथे योग आणि मल्लखांब यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या दौर्याच्या अंतर्गत स्वीत्झर्लंड येथे योग आणि मल्लखांब यांचा प्रसार करण्यात येणार आहे. स्वीत्झर्लंड येथे मल्लखांब प्रशिक्षणाची केंद्रेही उभारण्यात येणार आहेत. क्रीडाक्षेत्रास आधुनिक आणि खेळांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी स्वीत्झर्लंड महाराष्ट्राला सहकार्य करणार आहे.