गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !

साधकांचे परम दैवत आणि अविनाशी गुरुतत्त्वाचे साकार रूप असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘गुरुरादिरनादिश्च गुरुः परमदैवतम् ।
गुरोः परतरं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ।।
– गुरुगीता, श्लोक ७७

अर्थ : गुरु सर्वांचे मूळ उगमस्थान (आदि) आहेत; पण गुरूंना स्वतःला दुसरे उगमस्थान (आदि) नाही. (गुरुतत्त्व स्वयंभू आहे.) गुरुच परम दैवत आहेत. गुरूंहून दुसरे श्रेष्ठ काही नाही. अशा श्री गुरूंना नमस्कार असो.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

भावार्थ : ज्याप्रमाणे ‘आकाश किंवा सूर्य यांचा उगम कसा झाला ? कुठून झाला ?’, असे आपण विचारत नाही; कारण ते अनादि आहेत. त्याचप्रमाणे अनादि अनंत अशा गुरुतत्त्वाची प्रचीती देणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनाही आदि किंवा अंत नाही. हे अविनाशी गुरुतत्त्वाचे साकार रूप असलेल्या गुरुनाथा, आपण अनादि आहात, आपण स्वयंभू आहात, आपणच आमचे परम दैवत आहात. आम्हा साधकांची आपल्या चरणी दृढ निष्ठा सदैव रहावी आणि याच दृढ निष्ठेने आम्हाला आपल्या श्री चरणांशी एकरूप होता येऊ दे. अशा अनादि आणि अनंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः नमन !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (१०.५.२०२३)