विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी आध्यात्मिक धाग्याने जोडले गेलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जीवनपट विविधांगी कार्यांनी भारलेला आहे. सनातनच्या साधकांची त्यांच्यावर अपार श्रद्धा आहेच; त्यासह अनेक क्षेत्रांतील अनेक जिज्ञासू आणि मान्यवर त्यांच्याशी ते आपलेपणाने जोडले गेलेले आहेत. या अंकात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी गुरुदेवांविषयी काढलेले गौरवोद्गार प्रसिद्ध केले आहेत. अनेक मान्यवरांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांविषयी काढलेले उद्गार, त्यांची गायलेली महती, मान्यवरांना आलेले अनुभव आदी गोष्टी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे अलौकिकत्व दर्शवतात. यांतील काही मान्यवर त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग शिखरावर आहेत. असे असूनही ‘प्रत्यक्ष देव पाहिला आणि जीवनाचे कल्याण झाले’, अशा प्रकारे मान्यवरांनी त्यांचे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांविषयीचे मनोगत मांडले आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या (गुरुदेवांच्या) अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सहभागी साधकांचा जो त्यांच्याविषयी भाव किंवा श्रद्धा आहे, तेवढीच किंबहुना थोडी अधिकच गुरुदेवांनी आरंभलेल्या विविध कार्यांमध्ये सहभागी होण्याच्या निमित्ताने त्यांना भेटलेल्या मान्यवरांची आहे’, असे दिसून येते. बरेच मान्यवर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आध्यात्मिक श्रेष्ठत्व पहिल्याच भेटीत जाणतात. हे गुरुदेवांना भेटणार्‍या मान्यवरांचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल ! सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमध्ये असे काहीतरी आहे की, एकदा त्यांच्याकडे गेलेली व्यक्ती त्यांचीच होते ! तिला पुनःपुन्हा गुरुदेवांना भेटावेसे वाटते. ही आहे गुरुदेवांची सर्वांवरील निरपेक्ष प्रीती ! याच निरपेक्ष प्रीतीमुळे जिज्ञासू अथवा मान्यवर पहिल्या भेटीतच त्यांच्याशी कशा प्रकारे जोडले जातात, हे या निमित्ताने पाहूया !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा साधेपणा

कोणालाही प्रथम भेटीत भावतो, तो त्यांचा साधेपणा आणि सहजता ! सर्वसाधारणपणे ‘गुरु’ किंवा ‘संत’ यांच्याबद्दल अनेकांच्या मनात जी प्रतिमा असते, ती सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या दर्शनाने पालटते. या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ मुरली मनोहर शर्मा म्हणाले होते, ‘गुरूंना भेटायचे म्हटल्यावर माझ्या डोळ्यांसमोर चित्र उभे राहिले की, मोठे सभागृह असेल. त्याच्या मध्यभागी उंच सिंहासन असेल. भगवी वस्त्रे, गळ्यात माळा धारण केलेली व्यक्ती त्यावर विराजमान होऊन आम्हाला मार्गदर्शन करील. तिच्या आजूबाजूला सेवेकरी असतील. प्रत्यक्षात मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीत मी अवाक् झालो. एक शुभ्र पांढर्‍या वस्त्रांतील तेजस्वी व्यक्ती समोर येऊन आमच्याशी सहजतेने चर्चा करत होती. हे एक विरळा दृश्य होते.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर अत्यंत सहजतेने संवाद साधत असल्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक श्रेष्ठत्वाचे कुणाला दडपण येत नाही. काही वेळा त्यांच्याशी बोलणारी व्यक्ती ‘त्यांना अनेक वर्षांपासून ओळखत आहे’, अशा पद्धतीने सर्वकाही मोकळेपणाने सांगू लागते, तेव्हा ‘ही त्यांची एकमेकांशी पहिलीच भेट आहे’, हे सांगूनही खरे वाटत नाही !

२. प्रथम भेटीतच सर्वांशी आपलेपणाने बोलणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची अत्यंत उच्च आध्यात्मिक स्थिती असूनही ते सर्वांशी इतके आपलेपणाने बोलतात की, पहिल्याच भेटीत ती व्यक्ती त्यांच्याशी जोडली जाते. मान्यवरांसमवेत आलेले त्यांचे कुटुंबीय, सहकारी यांच्याशीही गुरुदेव संवाद साधतात. त्यांची लहान मुले आली असल्यास त्यांच्याशीही बोलतात, त्यांच्या समवेत छायाचित्र काढून घेतात. ‘वास्तविक भगवंतासमोर कुणी लहान-मोठा नसतोच ! तो प्रत्येकाच्या अंतरीच्या भावाची नोंद घेतो’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सहवासात प्रकर्षाने जाणवते !

३. समोरच्या व्यक्तीला बोलायला प्रवृत्त करणे, तिचा संकोच दूर करणे, तसेच तिचे सर्व ऐकून घेणे

डावीकडून श्रीलंका येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन, बांग्लादेश येथील ‘बांग्लादेश मायनॉरिटी वॊच’चे अध्यक्ष पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष आणि नेपाळ येथील श्री. माधव भट्टराय यांच्याशी संवाद साधतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे अध्यात्मातील उच्चतम पदावरील एक अधिकारी व्यक्ती असूनही प्रथम समोरच्या व्यक्तीला स्वतः काही न सांगता तिला बोलायला प्रवृत्त करतात. तिच्या मनातील जाणून असा अचूक प्रश्न विचारतात की, त्या व्यक्तीला त्याविषयीच सांगायचे असते किंवा त्याविषयीच तिला एखादा प्रश्न असतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपले मन मोकळे करता येते. तिच्या प्रश्नांची उत्तरे गुरुदेवांकडून सहजतेने मिळतात. त्यामुळे समोरची व्यक्ती आणखी आणखी बोलायला उत्सुक होते. तिच्या मनातील ‘काय बोलावे आणि कसे बोलावे ?’, हे प्रश्न दूर होतात. तिचा संकोच दूर होतो आणि तिला सहजतेने संवाद साधता येतो. गुरुदेवांची सर्वज्ञता तिच्या लक्षात येते. एखादी व्यक्ती पुष्कळ बोलकी असते. तिलाही मधे न अडवता गुरुदेव तिचे सर्व ऐकून घेतात. तसेच तिला मधे मधे योग्य तो प्रतिसादही देतात.

४. इतरांच्या चांगल्या कार्याचे कौतुक करून प्रोत्साहन देणे

मान्यवरांनी केलेल्या कार्याचे गुरुदेवांना पुष्कळ कौतुक वाटते. तळमळीने कार्य करणार्‍यांना ते स्वतः खाऊ किंवा अन्य काही भेटवस्तू देऊन प्रोत्साहन देतात. काही वेळा असे करणे प्रकृतीच्या कारणाने त्यांना शक्य नसेल, तर अन्य संतांच्या हस्ते देतात; परंतु समष्टीच्या कल्याणासाठी कुणी नि:स्वार्थ भावाने कार्य करत आहे आणि गुरुदेवांनी त्याच्या त्यागाची, समर्पणाची नोंदच घेतली नाही, असे कधीच होत नाही. महत्त्वाचे म्हणजे ते सर्व क्षेत्रांतील मान्यवरांशी त्यांच्या आवडीच्या विषयावर संवाद साधू शकतात. प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्याशी बोलतांना तितकीच सहजता जाणवते, हे मोठे वैशिष्ट्य आहे.

कु. सायली डिंगरे

५. प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार ‘आहे त्या परिस्थितीत’ साधना करण्याची प्रेरणा देणे

कुणी मान्यवर आध्यात्मिक साधना करत असतील, तर त्यांच्या साधनेच्या प्रयत्नांचेही ते कौतुक करतात, तसेच साधनेत अधिक पुढे जाण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांचा इतरांना भावणारा गुण म्हणजे ते समोरच्याचे पूर्ण ऐकून घेतात. वास्तविक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या प्रेरणेने प्रचंड मोठे कार्य चालू आहे, अनेक साधक अध्यात्मात उन्नती करत आहेत; पण सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर इतरांसमोर यातले काहीच सांगत नाहीत. ते केवळ समोरच्याचे म्हणणे पूर्ण ऐकून घेऊन आहे त्या परिस्थितीत, स्वतःच्या आवडीनुसार, कौशल्यानुसार तो कशा प्रकारे साधनेचे प्रयत्न करू शकतो, याविषयी मार्गदर्शन करतात.

६. समोरच्याला राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी करून घेऊन त्यांच्याकडून समष्टी साधना करून घेणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर स्वतः सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. साधकांनाही त्यांनी तीच शिकवण दिली आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधतांना त्यांना काही निराळे सूत्र समजल्यास ‘हे तुमच्याकडून शिकायला मिळाले’, असे ते अत्यंत नम्रतेने म्हणतात, तेव्हा बोलणार्‍याचे हात आपोआपच जोडले जातात ! मान्यवरांची कार्यक्षमता, त्यांचे कौशल्य यांचा राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी उपयोग व्हावा अन् त्या माध्यमातून त्या व्यक्तींचीही समष्टी साधना घडावी, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर विविध क्षेत्रांतील मान्यवरांना भेटतात, तेव्हा अत्यंत नम्रतेने विनंती करतात की, ‘आमच्या साधकांनाही या क्षेत्रातील मार्गदर्शन करा.’

यामागे ‘स्वतःच्या कार्याला हातभार लागावा’, असा संकुचित विचार मुळीच नसतो, तर ‘त्या व्यक्तीच्या हातून काहीतरी साधना घडून त्याचे कल्याण व्हावे’, असा व्यापक उद्देश असतो. गुरुदेवांच्या या कृपावात्सल्यामुळेच तो जीव कोणतेही बाह्य कारण नसतांना आतूनच त्यांच्याशी जोडला जातो.

७. स्वतःला अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही इतरांचे आध्यात्मिक कल्याण करण्यास प्राधान्य देणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील आपलेपणा, प्रीती, निरपेक्षता आणि त्यांचे दिव्य तेज यांमुळे त्यांना एकदा भेटलेली व्यक्ती कायमचीच त्यांची होऊन जाते. त्यांचा सहवास ही दिव्य आनंदाची पर्वणी असते. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर व्यक्तीच्या चेहर्‍यावर पसरलेले हास्य, समाधान आणि तृप्त भाव हे ‘त्या काही मिनिटांच्या संवादाने त्या जिवाला किती भरभरून आध्यात्मिक लाभ झाला आहे’, हेच दर्शवतात ! सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना काही वेळा काही मिनिटेही बसणे अशक्य असते. अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही केवळ समोरच्यांना आनंद मिळावा; म्हणून ते स्वतःच्या स्थितीचा विचारही न करता त्यांच्याशी संवाद साधतात. स्वतःच्या स्थितीपेक्षा त्या जिवाचे आध्यात्मिक कल्याण करण्यास गुरुदेव नेहमीच प्राधान्य देतात.

समोरच्या व्यक्तीच्या मुखावर पसरलेले हास्य, त्याच्या साधनेला मिळणारी गती, हेच गुरुदेवांनी अत्यंत कठीण शारीरिक स्थितीतही साधलेल्या संवादाचे खरे फलित असते !

सूर्यफुले सूर्याच्या दिशेने अनुगमन करतात. त्याचप्रमाणे सर्व सात्त्विक जीव सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांकडे स्वतःहून आकर्षित होतात, त्यांचे दिव्यत्व जाणतात आणि त्यांनी सांगितलेल्या साधनापथावर मार्गक्रमण करतात. विविध क्षेत्रांतील, विविध समाजघटकांतील मान्यवरांना सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांविषयी वाटणारा भाव, आदर हे त्यांच्यातील चैतन्यशक्तीचे प्रतीक आहे !

स्वतःतील दिव्यत्वाद्वारे सर्वांना ईश्वरप्राप्तीच्या दिशेने मार्गस्थ करणारे गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या दिव्य आणि पावन चरणी कोटी कोटी प्रणाम !’

– कु. सायली दिलीप डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.५.२०२३)