कहां फेके कचरा…?

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिदिन ‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल…’, असे गाणे ऐकवणार्‍या कचरा गाडीने जनतेला स्वच्छतेच्या दृष्टीने बर्‍याच चांगल्या सवयी लावल्या. कचरा इतरत्र फेकू नये, सुका आणि ओला कचरा निराळा करून ठेवावा इत्यादी; पण ही गाडी आता सामान्यांना त्रास देऊ लागली आहे, असे नुकत्याच घडलेल्या प्रसंगातून लक्षात येते.

आमच्या भागात कचरा गाडी येते; परंतु तिची वेळ ठरलेली नाही (पूर्वी वेळ ठरलेली होती), गाडीतील कर्मचारी कधी शिट्टी वाजवत किंवा ध्वनीक्षेपकाद्वारे गाणे वाजवत येते, तर कधी ती येऊन गेल्याचे पुढच्या गल्लीत गेल्यावरच कळते. सध्या ५ ते ६ दिवस कचरा तसाच राहू लागला आहे. कारणही तसेच आहे. पहिले ३ दिवस कचरा गाडी आली आणि बाहेर जाईपर्यंत गाडी निघून गेली. चौथ्या दिवशी गाडीची वाट न बघता अंगणात कचरा नेऊन ठेवला, तर त्या दिवशी गाडी आलीच नाही. पाचव्या दिवशी मात्र केवळ गाडीचीच वाट बघत होते. अखेर कचरा गाडी आली. ती थांबवून फाटक उघडून कचरा घ्यायला सांगितले, तर समोरून उत्तर आले, ‘आज लेता हूं, रोज गेट खोलके लेना हो तो अलगसे पैसे लगेंगे ।’ हे उत्तर ऐकून पुष्कळ चीड आली.

माझ्यासारख्या अनेक माता, भगिनी, ज्येष्ठ नागरिक असतील, जे अशा समस्यांना सामोरे जात असतील. गाडी आली की, लेकरांना सोडून धावायचे का ? ज्येष्ठ नागरिकांनी धडपडत जायचे का ? नोकरीला जाणार्‍यांनी कचरा फेकायला सुट्टीच्या दिवसाची वाट बघायची का ? कि कचरा फाटकाच्या बाहेर ठेऊन भटक्या कुत्र्यांना कचर्‍याचे प्रदर्शन मांडण्यासाठी आमंत्रण द्यायचे ? सध्या कुठेही कचरा टाकू शकत नाही; कारण मोठी दंडात्मक कारवाई होणार, हे ठाऊक असते. कचरा घरातच सडवत ठेवायचा का ? नाही, तर मग उरतो दुसरा पर्याय ! गाडीवाल्याला प्रतिमास शे-दोनशे रुपये देऊन आपली समस्या सोडवायची; पण याने खरच समस्या सुटते का ? सामान्य जनतेला दिलासा कधी मिळणार ? गाडीवाल्याची तक्रार कुणी करणार नाही; कारण आपण तक्रार केल्याचे समजले, तर तो पैसे देऊनही कचरा नेणार नाही, अशी भीती असते. त्यामुळे महानगरपालिकेने या विषयात लक्ष घालून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. अन्यथा अशा बर्‍याच मोहिमा येतील आणि ९ दिवसांची नवलाई संपली की, त्या मोठ्या समस्या निर्माण करतील. सध्या माझ्या समोर प्रतिदिन हाच प्रश्न असतो, ‘कहां फेके कचरा…!’

– सौ. केतकी हरदास, नागपूर