मालवण – तालुक्यातील आचरा येथे युवकांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसान गोळीबार आणि चॉपरने (एक प्रकारच्या धारदार शस्त्राने) आक्रमण करण्यात झाले. या घटनेत २ युवक घायाळ झाले. आक्रमण करणार्यांनी पसार होण्याचा प्रयत्न केला; मात्र ग्रामस्थांनी त्यातील दोघांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले, तर पसार झालेल्या एकाला पोलिसांनी पकडले. या प्रकरणी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने ९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर घायाळ झालेल्या एका संशयित आरोपीवर उपचार चालू आहेत.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार तौकिर काझी हा युवक आणि आचरा डोंगरेवाडी, पारवाडी येथील युवक यांच्यात काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर तौकिर तेथून निघून गेला आणि थोड्या वेळानंतर शुभम् जुवाटकर आणि प्रतीक हडकर या सहकार्यांना घेऊन आला. आचरा येथे डोंगरेवाडी, पारवाडी येथील युवक ज्या चारचाकीमध्ये बसले होते, त्या चारचाकीसमोर दुचाकी आडवी उभी केली आणि चारचाकीतील युवकांना अपशब्द वापरून चॉपरने त्यांच्यावर आक्रमण केले. या आक्रमणात चारचाकीतील गौरव पेडणेकर घायाळ झाला. तसेच चारचाकीतील अन्य युवकांवर गोळीबार करण्यात आला; मात्र ते सुदैवाने वाचले. यातील जुवाटकर हा घटनास्थळावरून पसार झाला, तसेच तौकिर आणि प्रतीक हडकर हे पळून जात असतांना ग्रामस्थांनी त्यांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. या वेळी झालेल्या झटापटीत जुवाटकर याच्याकडील बंदूक आणि चॉपर (धारधार शस्त्र), तसेच अन्य साहित्य रस्त्यावर पडले होते. या प्रकरणी पोलिसांनी हडकर आणि तौकिर काझी यांना अटक केली, तर घायाळ झालेला शुभम् जुवाटकर याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.