देशाचे तुकडे करणार्‍यांचे आदर्श ठेवणार्‍यांना स्वातंत्र्यवीर सावरकर कळतील का ?

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथावरून काँग्रेसच्या माजी आमदार कु. प्रणिती शिंदे यांनी टीका केल्याचे प्रकरण

आपल्याला (कु. प्रणिती शिंदे यांना) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेला ‘सहा सोनेरी पाने’ ग्रंथ समजणार नाही. सिद्धेश्वर मंदिरासमोरील अतिक्रमणाला संरक्षण देणार्‍या आपल्या पिताश्रींनी (सुशीलकुमार शिंदे यांनी) ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द जन्माला घातला. त्यामुळे ‘सहा सोनेरी पाने’ हा ग्रंथ तुम्हाला समजणार नाही.

सत्ता मिळवण्याची घाई झाल्याने मातृभूमीचे तुकडे पाडण्यास मान्यता देऊन याच भूमीवर पाकिस्तान जन्मास घालण्याचे पाप करणारे तुमचे आदर्श आहेत. त्यामुळे मातृभूमीसाठी जन्मठेप भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर तुम्हाला कळणे शक्य नाही. मातृभूमीचे तुकडे पडल्याची किंचित्ही वेदना तुमच्या अंत:करणात असती, तर तुम्हाला ‘सहा सोनेरी पाने’ समजण्याची थोडी शक्यता…

स्वातंत्र्यवीर सावरकर

काय वाचाल, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर कळतील ?

१. तुम्ही ‘ट्रॅजिक स्टोरी ऑफ पार्टिशन’ म्हणजेच फाळणीची शोकांतिका हे पुस्तक वाचा. मग तुम्हाला कळेल, ‘सहा सोनेरी पाने.’

२. तुम्ही तुमच्या मतदारसंघात मागील निवडणुकीत झालेल्या मतदानाचे विश्लेषण करा, मग तुम्हाला कळेल, ‘सहा सोनेरी पाने.’

३. मागील ३५० वर्षांत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अजरामर काव्य निर्मिती ज्यांनी केली, अशी तीनच नावे जगाला ठाऊक आहेत :

अ. कवी भूषण (इंद्र जिमी जंभ पर..)

आ. समर्थ रामदासस्वामी (शिवकल्याण राजा)

इ. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा)

४. तुम्ही सावरकर चरित्र वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की, शिवचरित्रातून सावरकर कसे निर्माण होतात ?

५. तुम्ही ‘समग्र आंबेडकर’ आणि ‘समग्र सावरकर’ वाचा, तरच तुम्हाला आंबेडकर अन् स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यातील ऋणानुबंध समजतील. (संदर्भ लक्षात न घेता तत्कालीन टीका-टिपणी यांचा आज आपल्या राजकीय सोयीसाठी गैर अर्थ काढू नका. अन्यथा चाचा नेहरू हे नेताजींच्या कथित मृत्यूनंतरही त्यांना पकडून देण्यासाठी ब्रिटिशांशी कसा पत्रव्यवहार करत होते, किंबहुना ते नेताजींच्या जीवावर कसे उठले होते, नेताजींना स्वातंत्र्यानंतरही गुमनामी आयुष्य कसे जगावे लागले, यासंबंधीची सर्व कागदपत्रे आता सार्वजनिक झाली आहेत, ते वाचा.)

देश स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर कार्य करू लागला आहे !

असो. मतांच्या तुष्टीकरणाच्या इतक्याच मर्यादित उद्देशाने तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी टिपणी करत असाल, तर चालू द्या. सावरकर मृत्यूंजय आहेत. डोळे उघडे ठेवून पहाल, तर ध्यानात येईल की, देश केव्हाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर कार्य करू लागला आहे. चीन, पाकिस्तान यांच्या संबंधांचे धोरण, ईशान्य भारत सीमेवरील सज्जता आदी अनेक विषय लिहिण्यासारखे पुष्कळ आहेत; पण तुमच्यासाठी (प्रणिती शिंदे यांच्यासाठी) सध्या इतके पुरेसे वाटते.

– श्री. सिद्धाराम भै. पाटील, पत्रकार, सोलापूर (२६.४.२०२३)