सातारा – राष्ट्रवादी काँग्रेसने सुप्रिया सुळे यांना पुढचा अध्यक्ष बनवावे; कारण त्यासाठी त्या सक्षम आहेत. अजित पवार हे घोटाळेबाज आणि गुन्ह्यात अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते; म्हणून त्यांना अध्यक्षपद देणे, हे चुकीचे ठरेल, असे मत ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले.
१. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यांच्या आरोपप्रकरणी ‘ईडी’ अन्वेषणासाठी बोलावते, तर १ सहस्र ४०० कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप असलेल्या अजित पवार यांना अन्वेषणासाठी का बोलावले जात नाही ? त्यांच्या मागे भाजपच्या एका मोठ्या नेत्याचे हात असल्याने त्यांना कोणत्याही अन्वेषणासाठी बोलावण्यात येत नाही.
२. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खासदार शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय पुष्कळ घाईत घेतला. शरद पवार माझ्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहेत. मी अजूनही कामकाज सांभाळते. त्यामुळे पवारांनी एवढ्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती.