मुंबई – रस्त्यांची गुणवत्ता, तसेच देखभाल आणि दुरुस्ती यांसाठी राज्यशासनाने महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ मे या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होणार.#मंत्रिमंडळनिर्णय#महाराष्ट्र #CabinetDecisions #Maharashtra pic.twitter.com/B16mz4Lyea
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 3, 2023
या महामंडळाचे भागभांडवल १०० कोटी रुपये रहाणार आहे. यामध्ये ५१ टक्के इतका शासनाचा हिस्सा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामध्ये रस्ते आणि इमारती विकास, तसेच देखभाल पूरक निधी यांचीही उभारणी करण्यात येईल. राज्यातील ३ लाख किलोमीटर लांबीच्या रस्त्यांपैकी १ लाख किलोमीटरचे प्रमुख राज्य आणि जिल्हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. या रस्त्यांची वेळोवेळी देखभाल आणि दुरुस्ती करावी लागते. अवजड वाहनांमुळे हे रस्ते खराब होतात. या महामंडळाद्वारे याची पहाणी केली जाईल, असे राज्यशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.