अमेरिकेला गंभीर आर्थिक संकटाचा धोका

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी चेतावणी दिली आहे की, जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेला गंभीर आर्थिक संकटाचा धोका उद्भवू शकतो. अर्थमंत्र्यांनी संसदेच्या अध्यक्षांना पत्र लिहून देशाने थकबाकी केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असे म्हटले होते.

अमेरिकेचे ‘ट्रेझरी सेक्रेटरी’ जेनेट येलेन यांनी चेतावणी दिली आहे की, १ जूनपर्यंत देयके भरण्यासाठी सरकारकडची रोख रक्कम संपुष्टात येऊ शकते. अर्थमंत्र्यांच्या चेतावणीनंतर बायडेन प्रशासन गोंधळून गेले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काँग्रेसच्या संसद सदस्यांसोबत बैठक बोलावली आहे. अमेरिकेतील या आर्थिक संकटाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो .

अमेरिका ही जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. जर अमेरिकेने चूक केली, तर त्याचा संपूर्ण जगावर परिणाम होईल.आर्थिक संकटामुळे अमेरिकेत सुमारे ७० लाख लोकांच्या नोकर्‍या जाऊ शकतात. यासोबतच अमेरिकेचा सकल राष्ट्रीय उत्पन्न एका झटक्यात ५ टक्क्यांपर्यंत घसरू शकते.