पृथ्वीवरील कोणातीही जागा प्रदूषणापासून मुक्त नाही ! – संशोधन

सध्या वापरात असलेली ३ लाख ५० सहस्रांहून अधिक रसायने पर्यावरणाला प्रदूषित !

स्टॉकहोल्म (स्विडन) – प्रशांत महासागरात २६ सहस्र २४६ फूट खोलपर्यंत प्रदूषण पसरले आहे. २० व्या शतकात मानवनिर्मित प्रदूषणापैकी ६० टक्के प्रदूषण समुद्राच्या खोल तळाशी साचले आहे. यातून पृथ्वीवरील कोणातीही जागा प्रदूषणापासून मुक्त नाही, असा निष्कर्ष येथील स्टॉकहोल्म विश्‍वविद्यालयाच्या नैसर्गिक विज्ञान विभागाच्या शास्त्रज्ञांनी एका संशोधनाद्वारे काढला. ‘द नेचर’ या वैज्ञानिक नियतकालिकातून एप्रिल मासात हे संशोधन मांडण्यात आले आहे.

१. संशोधकांचे म्हणणे आहे की, सध्या जगभरात वापरात असलेली ३ लाख ५० सहस्रांहून अधिक रसायने पर्यावरणाला प्रदूषित करत आहेत. प्रशांत महासागराच्या तळाशी असलेले प्रदूषण मानवासाठी धोकादायक आहे.

२. पॅसिफिक महासागरात २६ सहस्र २४६ फूट खोल असलेल्या ‘अटाकामा ट्रेंच’ या पृथ्वीवरील सर्वांत खोल आणि दुर्गम ठिकाणी मानवनिर्मित प्रदूषक अलीकडेच सापडले आहेत. अशा दुर्गम ठिकाणी ‘पॉलीक्लोरिनेटेड बायफेनिल्स’ नावाचे प्रदूषक आढळून आले, असे संशोधकांनी म्हटले आहे.

‘पॉलिक्लोरिनेटेड बायफेनिल्स’चा गेल्या शतकात झाला अतिरेकी वापर !

१९३० ते १९७० च्या दशकात बहुतेक उत्तर गोलार्धात ‘पॉलिक्लोरिनेटेड बायफेनिल्स’ची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. हे विद्युत् उपकरणे, ‘पेंट’ (रंग) आणि इतर अनेक वस्तूंकरिता याचा वापर केला गेला. १९६० च्या दशकात हे लक्षात आले की, यामुळे समुद्री जीवसृष्टीला हानी पोचत आहे. यामुळे १९७० च्या दशकाच्या मध्यात त्यांच्या वापरावर जागतिक स्तरावर बंदी घालण्यात आली.

संपादकीय भूमिका

निसर्गाला घातक असलेल्या रसायनांची निर्मिती करणार्‍या विज्ञानाचे हेच का फलित ? यातून विज्ञान हे मानवाला वरदान ठरत आहे कि शाप, असा प्रश्‍न निर्माण होतो !