गेल्या वर्षात भारत आणि रशिया यांच्यात ३६३ लाख कोटी रुपयांचा व्यापार !

मॉस्को (रशिया) – रशिया हा भारताचा ५ वा सर्वांत मोठा व्यावसायिक भागीदार झाल्याची माहिती ‘आर्.आय.ए. नोवोस्ती’ या रशियन सरकारच्या वृत्तसंस्थेने दिली. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये रशियाने भारताला एकूण ४१.६ अब्ज अमेरिकी डॉलर्सची (३४० लाख कोटी रुपयांची) उत्पादने निर्यात केली असून भारताकडून २.८ अब्ज अमेरिकी डॉलर्सची (साधारण २३ सहस्र कोटी रुपयांची) उत्पादने आयात करण्यात आली. यामुळे उभय देशांतील एकूण व्यापार हा ४४ अब्ज डॉलर्सहून अधिक (साधारण ३६३ लाख कोटी रुपयांहून अधिक) रकमेचा झाला आहे.

भारत आणि रशिया यांच्यातील व्यवसाय हा मुख्यत्वे भारताने रशियन तेल मोठ्या प्रमाणात विकत घ्यायला आरंभ केल्याने वाढला. मार्च २०२३ मध्ये भारताने एका दिवसात अधिकाधिक १६ लाख ४० सहस्र बॅरेल तेल विकत घेतले. भारताच्या एकूण तेल आयातीत रशियाचा ३४ टक्के इतका वाटा आहे.

भारताशी सर्वाधिक व्यापार करणारे ५ देश !

१. अमेरिका – ११८.२ अब्ज अमेरिकी डॉलर
२. चीन – १०४.३ अब्ज अमेरिकी डॉलर
३. संयुक्त अरब अमिरात – ७७.६ अब्ज अमेरिकी डॉलर
४. साऊदी अरेबिया – ४८.३ अब्ज अमेरिकी डॉलर
५. रशिया – ४४.४ अब्ज अमेरिकी डॉलर