छत्रपती संभाजीनगर – तेलंगाणा राज्यनिर्मितीआधी राज्याची स्थिती वाईट होती; पण आता तिथे शेतकर्यांना विनामूल्य वीज मिळत आहे. २४ घंटे वीज आम्ही देतो. तेलंगाणा छोटे आणि महाराष्ट्रापेक्षा कमजोर राज्य आहे; पण तिथे जे जमते ते महाराष्ट्रात का होत नाही ? पाणी देऊ शकत नाही. वीज २४ घंटे देत नाही. पुढचे सरकार जर ‘बी.आर्.एस्.’चे बनले, तर प्रत्येक गोष्ट आम्ही देऊ, असा तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आश्वासन दिले. के.सी.आर्. यांची २४ एप्रिल या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या जबिंदा मैदानावर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते.
चंद्रशेखर राव म्हणाले की, महाराष्ट्रात जर आमचे सरकार बनवले, तर प्रत्येक घरोघरी नळ आणि पाणी असेल. तेलंगाणात सर्वांना मुबलक पाणी मिळते, ते महाराष्ट्रातही शक्य आहे. शेतकर्यांनाही आम्ही मुबलक पाणी देऊ. सर्व शेतकर्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. पाण्याच्या सदुपयोगाचे ज्ञान अनेक देशांनी अवगत केले; पण भारताने अजून केले नाही.