गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा ५० वा वाढदिवस आज विविध उपक्रमांनिशी साजरा होणार

पणजी, २३ एप्रिल (वार्ता.) – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा ५० वा वाढदिवस सोमवार, २४ एप्रिल या दिवशी थाटात आणि विविध उपक्रमांनिशी साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस सेवा, सुशासन आणि जनकल्याण या कार्यक्रमांसह लोककल्याणासाठी समर्पित केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून कळवण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांचा २४ एप्रिलचा दिनक्रम

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत २४ एप्रिल या दिवशी सकाळी ८.३० वाजता वाढदिवसाचा प्रारंभ शिरगाव येथील श्री लईराईदेवीच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते सकाळी ९ वाजता अस्नोडा येथील ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ योजनेच्या लाभार्थी जयंती सातार्डेकर यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. सकाळी १०.३० वाजता ते साळगाव पंचायतीला भेट देतील. या ठिकाणी १०.४५ नंतर ते सर्व नगरपालिका आणि पंचायती यांच्याशी ‘ऑनलाईन’ संवाद साधणार आहेत. या ठिकाणी ते ‘स्वयंपूर्ण मित्र’च्या भूमिकेतून जनतेच्या तक्रारींचे निराकरण करणार आहेत. या दौर्‍यात ते कृषी साहित्याचेही वाटप करणार आहेत. यानंतर ते म्हापसा येथील मिलाग्रीस चर्चलाही भेट देणार आहेत. दुपारी ४ वाजल्यापासून ते पणजी येथील भाजपच्या कार्यालयात लोकांसाठी उपलब्ध असतील. सायंकाळी ७.३० वाजता ते सांखळी येथील श्री राधाकृष्ण देवतेची पूजा करून वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सांगता करणार आहेत. येथेही ते लोकांना भेटण्यासाठी उपस्थित असतील.

(सौजन्य : Prudent Media Goa)  

वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे विविध उपक्रम

१. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाच्या अंतर्गत ‘शिक्षा संगम’ या उपक्रमासाठी दुपारी ३ वाजता उपस्थित रहाणार आहेत.

२. यानंतर ‘एल्.अँड.टी.’, ‘डायकिन’ आणि अभिनव संस्था यांच्यासमवेत ते सामंजस्य करार करणार आहेत. याप्रसंगी निवडक उमेदवारांना औषधनिर्मिती क्षेत्रातील नोकरभरती पत्रांचे ते वाटप करतील.

३. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटणार – वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने २४ एप्रिल या दिवशी राज्यातील सर्व सरकारी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे.