‘मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते आणि त्यांच्याविषयी मला शिकायला मिळालेली सूत्रे प्रार्थना करत लिहिते. १६ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘सनातनशी संपर्क आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा पहिला सत्संग, साधकांना सांगितलेल्या प्रत्येक कृतीचे स्वतः आचरण करणारे परात्पर गुरु डॉक्टर’, ही सूत्रे वाचली.
(आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.)
७. समष्टी भाव
अ. ‘मी गुरुदेवांसाठी सरबत बनवून पाठवत असे. एकदा ते मुंबई येथून गोव्याला निघाले होते. तेव्हा मी त्यांच्यासाठी सरबताच्या ८ बाटल्या घेऊन गेले. त्या वेळी त्यांनी सहसाधिकेला सांगितले, ‘‘वाटेत ३ – ४ ठिकाणी थांबणार आहोत. तिथे एकेक बाटली देऊया.’’
आ. फोंडा (गोवा) येथील सेवाकेंद्रात भोजनकक्ष पहिल्या माळ्यावर आणि स्वयंपाकघर तळमजल्यावर होते. सेवा करण्याचे ठिकाणही तळमजल्यावर होते. भोजनकक्षात जातांना स्वयंपाकघराच्या दारावरून जावे लागायचे. तेव्हा गुरुदेव तेथे थांबून तेथील साधिकांना विचारायचे, ‘‘भोजनकक्षात काही घेऊन जायचे आहे का ?’’
८. साधिकेने सेवेच्या ठिकाणी चहा घेतल्यावर ‘पेला नंतर धुऊया’, असा विचार करून तसाच ठेवणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी उठून तो स्वतः धुणे
एकदा मुंबई येथील सेवाकेंद्रात श्रीमती रेबाताई आणि मी संगणकीय सेवा करत होतो. तेवढ्यात एका साधिकेने मला चहा आणून दिला. मी चहा घेतला आणि पेला बाजूला ठेवला. तेव्हा माझ्या मनात ‘सेवा संपल्यानंतर उठल्यावर धुऊया’, असा विचार होता. तेवढ्यात समोर बसलेले गुरुदेव उठले आणि माझा पेला धुवायला घेऊन गेले. यातून मला ‘तत्परता आणि ‘दिसेल ते कर्तव्य’, या उक्तीनुसार कृती करणे’, हे परात्पर गुरु डॉक्टरांमधील गुण शिकायला मिळाले. त्या दिवसापासून मी प्रसाद (अल्पाहार) आणि महाप्रसाद (जेवण) यांची भांडी लगेच धुते.
९. ‘शिळे अन्न प्रथम संपवायला हवे’, हे कृतीतून शिकवणे
एकदा सेवाकेंद्रात गुरुदेव इतर साधकांसह जेवायला बसले होते. मी आणि अन्य एक साधिका वाढत होतो. गुरुदेवांनी भात वाढायला सांगितला. भात वाढायला आणला असता ते मला म्हणाले, ‘‘आधीचा शिल्लक भात आधी वाढा.’’ त्यांना मी म्हटले, ‘‘तो आम्ही घेऊ. तुम्ही हा घ्या.’’ त्या वेळी त्यांनी नकार दिला आणि ‘तो आधीचाच भात वाढा’, असे सांगितले. यावरून ‘शिळे अन्न प्रथम संपवायला हवे’, हे मला शिकायला मिळाले. तेव्हापासून मलाही तशी सवय लागली; अन्यथा मी घरकामासाठी येणार्या बाईंना शिल्लक अन्न देत असे.
१०. दूरदृष्टी आणि साधकांवरील प्रेम अन् आपुलकी
एकदा गुरुदेवांनी मला ‘सर्व जिल्ह्यांत आणि राज्यांत जाऊन तेथील साधकांसह विज्ञापने गोळा करणे अन् जिज्ञासूंना संपर्क करणे’, या सेवा करायला सांगितले. त्याप्रमाणे मी सर्व जिल्ह्यांत जाऊ लागले. एकदा मी दौर्यावर जाण्यासाठी निघण्यापूर्वी त्यांनी मला अंदाजे १ किलो लिमलेटच्या गोळ्या पाठवल्या. त्या वेळी ‘त्यांनी पाठवलेल्या एवढ्या गोळ्यांचे काय करायचे ?’, हे मला कळले नाही.
नंतर मी जिथे सेवेला गेले, तिथे गुरुदेवांचा प्रसाद म्हणून मी त्या गोळ्या साधकांना देऊ लागले. तेव्हा त्या गोळ्या अगदी शेवटच्या साधकापर्यंत पुरल्या. यावरून त्यांची दूरदृष्टी आणि साधकांवरील प्रेम माझ्या लक्षात आले. याविषयी मी त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘मी सर्व जिल्ह्यांत जाऊन साधकांना भेटू शकत नाही. तुमच्या माध्यमातून साधकांना भेटतो.’’ त्या वेळी ‘गुरुदेवांना साधकांबद्दल किती प्रेम आणि आपुलकी आहे !’, हे माझ्या लक्षात आले अन् शिकायलाही मिळाले. त्या दिवसापासून मीसुद्धा कुठे बाहेर गेले की, तेथील साधकांसाठी आणि येतांना आश्रमातील साधकांसाठी खाऊ आणते.
११. ‘केवळ अर्पण आणि विज्ञापन न घेता प्रत्येक दात्याने साधनेला लागून अध्यात्मप्रसार, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांसाठीच्या कार्यात कृतीशील व्हायला हवे’, हे शिकवणे
एकदा एका विज्ञापनदात्याने गुरुपौर्णिमेच्या अर्पणाचा धनादेश दिला. याविषयी गुरुदेवांना सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘आपल्याला त्यांचे केवळ पैसे नकोत. त्यांनी साधना करायला हवी.’’ त्याप्रमाणे मी त्या व्यक्तीला गुरुदेवांचा निरोप दिला. तेव्हा त्या व्यक्तीने साधनेविषयी जाणून घेतले आणि त्या दिवसापासून ते स्वतः, त्यांचे कुटुंबीय अन् त्यांचे कर्मचारी साधना करू लागले. आता त्यांची व्यावहारिक आणि आध्यात्मिक प्रगती झाली आहे. ते गुरुदेवांच्या मार्गदर्शनानुसार व्यवसाय आणि साधना करून आनंदी आहेत. (गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे आता त्यांचे ध्येय ‘हिंदु राष्ट्रातील आदर्श गाव निर्माण करणे’, हे आहे.) यावरून ‘केवळ अर्पण आणि विज्ञापन घेणे नाही, तर त्या प्रत्येक दात्याने साधनेला लागून अध्यात्मप्रसार, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांसाठीच्या कार्यात कृतीशील व्हायला पाहिजे’, हे मला शिकायला मिळाले.
१२. हितचिंतक आणि विज्ञापनदाते यांच्यासाठी प्रसाद नेण्याची आठवण करून देणे
मी कधीतरी जेव्हा गुरुदेवांना भेटायला जायचे तेव्हा ते माझ्याकडे हितचिंतक आणि विज्ञापनदाते यांची विचारपूस करतात. मी तेथून निघतांना त्यांच्यासाठी प्रसाद नेण्याची आठवण करून देतात. यावरून ‘जिज्ञासूंना जोडून ठेवणे आणि प्रेमभाव’, हे गुण मला शिकायला मिळाले.
१३. गुरुदेवांनी नवीन सिद्ध झालेला धर्मरथ त्याच्या वितरकाला दाखवायला सांगणे, आस्थापनाच्या उपाध्यक्षांनी तो पाहून त्यांनी ‘धर्मरथासाठी भारतभर विनामूल्य सेवा उपलब्ध व्हावी’, यासाठी पत्र देणे
एकदा गुरुदेवांनी मला ‘आध्यात्मिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रसारासाठी एक मोठे वाहन घ्यायचे आहे’, असे कळवले. तेव्हा आपण ‘टाटा कंपनी’ या आस्थापनाचे वाहन त्यांच्या वितरकांकडून विकत घेतले आणि त्यावर धर्मरथाची बांधणी केली. धर्मरथ सिद्ध होऊन आल्यावर गुरुदेवांनी तो धर्मरथ त्या वितरकाला दाखवायला सांगितला. त्याप्रमाणे मी त्यांना धर्मरथ दाखवायला गेले. त्यांना तो पुष्कळ आवडला. त्या गाडीचा कायापालट झालेला पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्या वेळी तिथे असलेली एक व्यक्ती ते पहात होती आणि निरीक्षण करत होती. आमचे बोलणे संपल्यावर त्या व्यक्तीने मला स्वतःचे ‘व्हिजिटींग कार्ड’ दिले आणि त्यांच्या ‘चेंबर’मध्ये येऊन भेटायला सांगितले. ती व्यक्ती ‘टाटा मोटर्स कंपनी’ची ‘व्हाईस चेअरमन’ (उपाध्यक्ष) होती. त्यांना भेटले असता त्यांनी ‘आपल्या धर्मरथाची भारतभर विनामूल्य सेवा उपलब्ध व्हावी’, यासाठी एक पत्र दिले. त्या वेळी त्यांना धर्मरथ दाखवण्यामागील गुरुदेवांचा कार्यकारणभाव माझ्या लक्षात आला.
१४. ध्वनीचित्रीकरणाच्या सेवेशी संबंधित विविध उपकरणांच्या वितरकांकडे जाणे आणि संस्थेचे कार्य ऐकल्यावर त्यांनी प्रभावित होऊन संपूर्ण सहकार्य करणे
गुरुदेवांनी सनातनच्या ध्वनीचित्रीकरणाच्या सेवेशी संबंधित विविध प्रकारचे छायाचित्रक (कॅमेरे) आणि त्या संबंधीची उपकरणे खरेदी करण्यास सांगितले. एका साधकाने त्याची पूर्वसिद्धता आणि अभ्यास करून मला वितरकाकडे नेले. तेथे जाऊन त्यांना संस्थेचे कार्य सांगितल्यावर ते प्रभावित झाले. वितरक आम्हाला म्हणाले, ‘‘अन्य धर्मियांच्या स्वतःच्या वाहिन्या (चॅनल्स) आहेत. एक आध्यात्मिक आणि हिंदुत्वनिष्ठ संस्था स्वतःची वाहिनी चालू करणार आहे, तर त्याला माझ्याकडून संपूर्ण पाठिंबा राहील.’’ त्याप्रमाणे त्यांनी सर्व प्रकारचे सहकार्य केले.
त्या वेळी मला चित्रीकरण आणि त्यासाठी लागणारी उपकरणे यांविषयी अधिक ठाऊक नव्हते. केवळ गुरुदेवांनी सांगितले; म्हणून मी त्या सेवेसाठी होकार दिला आणि मी त्या साधकासह जाऊन त्या वितरकांना भेटले. त्यामुळे मला त्यातील बारकावे शिकायला मिळाले.
१५. कर्तेपणा अर्पण करायला शिकवणे
प्रत्येक वेळी गुरुदेव म्हणायचे, ‘‘प.पू. बाबांचा (प.पू. भक्तराज महाराज यांचा) आशीर्वाद आणि त्यांची कृपा यांमुळे हे सर्व होत आहे.’’ त्या वेळी ‘स्वतःकडे कर्तेपणा न घेता गुरुचरणी कर्तेपणा अर्पण करावा’, हे मला यातून शिकायला मिळाले.
१६. गुरुदेवांनी प्रत्येक सेवा करण्यासाठी घडवणे
साधनेत येण्यापूर्वी ३५ वर्षे मी स्वतःचा व्यवसाय करत होते. त्यामुळे साधनेत आल्यावर आरंभी कुणाकडे विज्ञापन मागणे आणि अर्पण मागणे मला जड गेले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेले प्रोत्साहन आणि केलेले मार्गदर्शन यांमुळे, तसेच त्यांनी स्वतःच्या कृतींतून शिकवल्यामुळे मी आश्रमासाठी अर्पण गोळा करणे, साहित्य खरेदी करणे, विज्ञापने मिळवणे अन् अध्यात्मप्रसार या सेवा करू शकले. मागे वळून पाहिल्यावर ‘आपण हे कसे करू शकलो ?’, याविषयी मला आश्चर्य वाटते. हे केवळ आणि केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच होऊ शकले आहे.
१७. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘माझी क्षमता नसतांनाही गुरुदेवांनी माझ्याकडून पुष्कळ प्रकारच्या सेवा करवून घेतल्या’, त्याबद्दल त्यांच्या कोमल चरणी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे. ‘गुरुदेवांनी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याकडून त्यांच्या चरणांची सेवा करून घ्यावी’, अशी अत्यंत शरणागतभावाने प्रार्थना करते.’ (समाप्त)
– श्रीमती स्मिता सुबोध नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.१.२०२३)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |