कोकणात ८ ठिकाणी उभ्या रहाणार समुद्रकुटी (बीच शॅक्स)

समुद्रकुटी (बीच शॅक्स)

रत्नागिरी – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रस्तावानुसार कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या ४ जिल्ह्यांतील ८ समुद्रकिनार्‍यांवर पर्यटनाला चालना देण्यासाठी समुद्रकुटी (बीच शॅक्स) उभारण्याला मान्यता देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली आणि कुणकेश्वर, रत्नागिरी जिल्ह्यातील आरे-वारे अन् गुहागर, रायगडमधील दिवेआगार आणि वर्सेली अन् पालघर जिल्ह्यातील बोर्डी आणि केळवा या ८ समुद्रकिनार्‍यांवर समुद्रकुटी (बीच शॅक्स) उभारण्यात येणार आहेत.

कोकणाच्या सौंदर्यकरणात समुद्राने मोठी भर घातली आहे. ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा कोकण किनारपट्टीला लागला आहे. स्वच्छ सुंदर आणि शांतता पूर्व परिसर हा येथील वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. पर्यटनाच्या दृष्टीने ही किनारपट्टी महत्त्वाची आहे. त्यामुळे कोकणात ८ ठिकाणी ही योजना अमलात आणली जाणार आहे.

कोकणातील स्थानिक रहिवाशांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘बीच शॅक्स’ उभारण्यात येणार आहेत. स्थानिक व्यक्तींना यात ८० टक्के जागा राखीव असतील. या कुट्यांचे ३ वर्षांकरता वाटप केले जाईल. किमान १५ फुटांची लांबी आणि रुंदी तसेच, १२ फूट उंचीची ही कुटी असणार आहे. प्रत्येक कुटीमध्ये बसण्यासाठी १५ ते २० फूट छत टाकता येईल, अशी व्यवस्था असणार आहे.

सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत या कुटी चालू ठेवण्यास मान्यता दिली जाणार आहे. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आणि पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागांवर या कुट्या उभारण्यासाठी अनुमती घ्यावी लागणार आहे. या अनुमतीसाठी लाभार्थ्यांना १५ सहस्र रुपयांचा निधी ना परतावा तत्त्वावर घेण्यात येणार आहे.