उस्मानाबाद जिल्ह्याला ‘धाराशिव’ हे नाव तूर्तास न वापरण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश !

पुढील सुनावणी ६ जूनला होणार !

मुंबई – उस्मानाबाद जिल्ह्याला ‘धाराशिव’ हे नाव न वापरण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ६ जून २०२३ ही पुढील सुनावणीची दिनांक दिली आहे. अंतिम अधिसूचना निघण्यापूर्वीच जिल्हा आणि तालुका या ठिकाणी ‘धाराशिव’ हे नाव वापरण्यात आले आहे. हे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने राज्याच्या महाधिवक्त्यांना जिल्हा आणि तालुका यांठिकाणी ‘धाराशिव’ हे नाव न वापरण्याचे आदेश दिले आहेत. ‘महसूल विभाग स्तरावर पालट होईपर्यंत उस्मानाबाद हे नाव पालटणार नाही’, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयात दिले आहे.

फेब्रुवारी २०२३ मध्ये औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याविषयी राज्याच्या प्रस्तावास केंद्र सरकारने संमती दिली होती, तर गृहमंत्रालयाने अधिकृत परिपत्रक काढून या प्रस्तावास मान्यता दिली होती. (नामांतरासाठीची प्रशासकीय पूर्तता लवकरात लवकर करून पुढील कार्यवाही करावी, असेच हिंदूंना वाटते. – संपादक)