मृत १४ जणांच्या शरिरात पाण्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती !

खारघर येथे उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांचा शवविच्छेदन अहवाल उघड !

१२ जणांच्या पोटात अन्नाचा एक कणही नसल्याचे स्पष्ट  

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा

खारघर (नवी मुंबई) – खारघर येथे ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्या कालावधीत उष्माघातामुळे मृत्यू पावलेेल्या १४ जणांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. ‘त्यांच्या शरिरात पाण्याचा अंश दिसत नव्हता’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितल्याचे समजते. ‘मृत्यूमुखी पडलेल्या १४ पैकी १२ जणांच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता’, असेही अहवालातून समोर आले. मृत्यूपूर्वी किमान ६ – ७ घंटे त्यांनी काहीही खाल्लेले नव्हते. १४ जणांपैकी काहींना व्याधीही होत्या. एकाला हृदयाशी संबंधित आजार होता. कार्यक्रमाची वेळ दुपारची असल्याने सोहळ्याच्या वेळी तेथील तापमान ४० अंश सेल्सिअस इतके होते. तेथे आलेल्या श्रीसदस्यांना उन्हात ६ – ७ घंटे बसून रहावे लागले.