गोवा : दोन शालेय विद्यार्थिनींनी ‘इन्स्टाग्राम’ पोस्टच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या

गुन्हे अन्वेषण विभागाकडून गुन्हा प्रविष्ट

पणजी, १९ एप्रिल (वार्ता.) – ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंट असलेल्या २ शालेय विद्यार्थिंनींनी ‘इन्स्टाग्राम’ पोस्टच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. हे पोस्ट सर्वत्र फिरू लागल्यानंतर आणि याविषयी माहिती मिळाल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने त्याची नोंद घेऊन दोन्ही इन्स्टाग्राम’ खातेधारकांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे.

या प्रकरणी अन्वेषणासाठी ‘सायबर क्राईम’ पोलिसांचेही साहाय्य घेतले जात आहे. गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन म्हणाले, ‘‘इन्स्टाग्राम’ला पत्र लिहून त्यांच्याकडून या दोन्ही खात्यांतील माहिती मागवली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांचे खाते बंद करण्यास सांगितले जाणार आहे. संबंधितांच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम १५३ (अ) उपकलम ३४ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६७ अंतर्गत प्रथमदर्शनी अहवाल नोंदवण्यात आला आहे.’’ ‘इन्स्टाग्राम’वर ‘सारा एक्सईसी’ आणि ‘शाझिया ७७७’ या २ अकाऊंटच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या आहेत. (खात्यांच्या नावावरून या धर्मांध विद्यार्थिनी वाटत असून लहानपणीच त्यांना हिंदुद्वेषाचे बाळकडू दिले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. – संपादक)

‘स्क्वींट नियोन’ या ट्विटर अकाऊंटकडून जागृती आणि आवाहन

‘स्क्वींट नियोन’ या ट्विटर अकाऊंटने ‘गोवा येथील ‘डी.ए.व्ही.’ पब्लीक स्कूलमध्ये शिकणार्‍या २ मुसलमान बहिणींनी हिंदु आणि हिंदु धर्म यांचे विडंबन केले आहे’, अशी माहिती गोवा पोलिसांना ट्वीट करून दिली आणि या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन केले.

गोव्यातील एखाद्या कार्यकर्त्याने याविरोधात तक्रार प्रविष्ट केल्यास चांगले होईल, असे ‘स्क्वींट नियोन’ यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)