एकनाथ खडसे यांसह पत्नी आणि जावई यांनी भूमी अवैधरित्‍या खरेदी केल्‍याचे मुंबई न्‍यायालयाचे निरीक्षण !

भोसरी भूमी खरेदी घोटाळा प्रकरण !

श्री एकनाथ खडसे व त्‍यांची पत्नी सौ. मंदाकिनी खडसे

मुंबई – सादर पुराव्‍यांचा विचार करता एकनाथ खडसे, त्‍यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांनी भोसरी येथील भूमी अवैधरित्‍या संपादित केल्‍याचे सकृतदर्शनी स्‍पष्‍ट होते, असे निरीक्षण मुंबई उच्‍च न्‍यायालयाने नोंदवले आहे. ‘एकनाथ खडसे यांनी केलेला पदाचा दुरुपयोग अयोग्‍य आहे’, असे मत नोंदवत न्‍यायालयाने त्‍यांचे जावई गिरीश चौधरी यांना जामीन नाकारला आहे.

न्‍यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्‍या खंडपिठापुढे १९ एप्रिल या दिवशी ही सुनावणी झाली. महसूलमंत्री या नात्‍याने खडसे यांना सार्वजनिक हिताचे कोणतेही निर्णय घेण्‍याचे अधिकार प्राप्‍त होते; परंतु त्‍यांनी स्‍वत:साठी किंवा कुटुंबासाठी स्‍वत:च्‍या अधिकारांचा उपयोग केला. अशा प्रकारे ‘स्‍वत:ला आर्थिक किंवा अन्‍य फायदा मिळवण्‍यासाठी अधिकारांचा उपयोग केला जाऊ शकत नाही’, अशी टिपणी या वेळी न्‍यायालयाने केली.

काय आहे प्रकरण ?

वर्ष २०१६ मध्‍ये युती सरकारच्‍या काळात तत्‍कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुणे जिल्‍ह्यातील भोसरी येथील महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्‍या मालकीची ३.१ एकर ४० कोटी रुपयांची भूमी पत्नी आणि सून यांच्‍या नावे अवघ्‍या ३.७५ कोटी रुपये किंमतीने खरेदी केल्‍याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हेमंत गवंडे यांनी केला. यावरून एकनाथ खडसे, त्‍यांची पत्नी सौ. मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्‍या विरोधात पोलिसांनी गुन्‍हा नोंदवला आहे. या प्रकरणी मुंबई सत्र न्‍यायालयाच्‍या विशेष न्‍यायालयात याविषयीचा खटला चालू आहे. या प्रकरणी गिरीश चौधरी यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक करण्‍यात आली असून ते सध्‍या कारागृहात आहेत.