भारताचे यशस्‍वी परराष्‍ट्र धोरण !

भारताने आक्रमक परराष्‍ट्र धोरण सातत्‍याने अंगीकारल्‍यास तो पुढे जागतिक क्षितिजावर एक उज्‍ज्‍वल स्‍थान निर्माण करील !

डॉ. एस्. जयशंकर

१. जागतिक क्षितिजावर भारताचे उज्‍ज्‍वल स्‍थान निर्माण होण्‍याचा काळ

‘मागील एक दशकाहूनही अल्‍प कालावधीत भारताच्‍या जागतिक धोरणामध्‍ये आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. प्रत्‍येक जागतिक समस्‍येच्‍या वेळी तथाकथित प्रमुख देशांचे लक्ष भारत काय करतो, याकडे लागलेले असते. रशिया आणि युक्रेन युद्धाच्‍या वेळी आपण हे सर्व पाहिलेले आहे. आता भारताला सुरक्षा परिषदेचे स्‍थायी सदस्‍यत्‍व मिळण्‍याची वेळ आली आहे, ज्‍यामुळे विश्‍वशांतीचा मार्ग सुकर होईल. भारताने ‘जी २०’चे अध्‍यक्षपद भूषवले आहे. (जी २० म्‍हणजे जगाच्‍या सकल उत्‍पन्‍नाच्‍या ८० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक उत्‍पन्‍न असणारे १९ देश आणि युरोपियन युनियन (यात २७ देश आहेत) यांचे अर्थमंत्री आणि मध्‍यवर्ती बँक गव्‍हर्नर यांची संघटना.) जागतिक धोरण चालवण्‍यासाठी संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या तुलनेत ‘जी २०’ हे महत्त्वपूर्ण व्‍यासपीठ आहे. हा सन्‍मान अशा वेळी प्राप्‍त झाला आहे, जेव्‍हा भारत महत्त्वपूर्ण विषयांचे नेतृत्‍व करण्‍यास आणि जगासमोर येणार्‍या समस्‍यांवर उपाययोजना देण्‍यास चांगल्‍या प्रकारे सिद्ध आहे.

भारताच्‍या ‘जी-२०’च्‍या अध्‍यक्षपदाचा कार्यकाळ हा भारताचा जागतिक दृष्‍टीकोनाचा कार्यक्रम, तसेच जागतिक विकास आणि प्रगती यांचे नेतृत्‍व करण्‍याच्‍या स्‍वरूपात वर येण्‍याचा कार्यकाळ असेल. भारत राष्‍ट्रीय आणि जागतिक हित साधण्‍याचा प्रयत्न करील, असे निश्‍चितपणे म्‍हणता येऊ शकते; कारण पुढे येणार्‍या जागतिक नेतृत्‍वासह भारताचे जागतिक क्षितिजावर एक उज्‍ज्‍वल स्‍थान निर्माण होत आहे.

२. ऑस्ट्‍रियामध्‍ये परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे पाकप्रेमी पत्रकाराला सडेतोड उत्तर !

एकेकाळी अशी समजूत होती की, परराष्‍ट्र धोरण हे भारतासाठी फार लांबची गोष्‍ट आहे, जे ‘साऊथ ब्‍लॉक’मध्‍ये बसून ठरवले जाते आणि ते समजणे देशाच्‍या सर्वसाधारण नागरिकांचे काम नाही. आता ही गोष्‍ट फार जुनी झाली. आज देशातील प्रत्‍येक युवकाला देशाच्‍या परराष्‍ट्र धोरणाविषयी जिज्ञासा आहे. या परिवर्तनाचे महत्त्वाचे कारण, म्‍हणजे जागतिक स्‍तरावर भारताची स्‍वत:ची असलेली अचूक भूमिका आणि तिचा झालेला सकारात्‍मक परिणाम ! परराष्‍ट्र धोरणामध्‍ये भारताचा झेंडा कशामुळे फडकत असावा ? या प्रश्‍नाचे उत्तर गेल्‍या ८ वर्षांपासून भारताकडून चालवल्‍या जाणार्‍या अभिमानास्‍पद धोरणांमधून आपल्‍याला मिळू शकते. याविषयीचे सध्‍याचे एक उदाहरण, म्‍हणजे युरोप दौर्‍याच्‍या वेळी ऑस्ट्‍रिया देशाने भारताचे परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांना निमंत्रण दिले होते. तेथे एका प्रसिद्ध वाहिनीवर त्‍यांचा एक वार्तालाप प्रसिद्ध झाला. तो युरोपसह पूर्ण जगामध्‍ये प्रसारित झाला. त्‍यात एका पत्रकाराने डॉ. एस्. जयशंकर यांना पाकिस्‍तान किंवा युरोप यांच्‍या बाजूने प्रश्‍न विचारले. सर्वप्रथम त्‍याने विचारले, ‘आपण प्रत्‍येक वेळी पाकिस्‍तानला ‘आतंकवादाचे केंद्र’ असे का म्‍हणत असता ?’ त्‍यावर बोलतांना डॉ. एस्. जयशंकर म्‍हणाले, ‘‘डिप्‍लोमॅट (परराष्‍ट्र धोरणामध्‍ये निपुण अधिकारी) असण्‍याचा अर्थ असा होत नाही की, मी योग्‍य उत्तर देऊ शकणार नाही. मी पाकिस्‍तानच्‍या संदर्भात याहून वाईट शब्‍दांचा वापर करू शकतो; परंतु मी तसे करत नाही. मी परत सांगतो, ‘पाकिस्‍तान आतंकवादाचे केंद्र आहे !’ जगाची आतंकवादाशी संबंधित समस्‍या सोडवायची असेल, तर पाकिस्‍तानला त्‍याची वागणूक सुधारावी लागेल.’’

या वेळी पत्रकाराने परत एकदा पाकिस्‍तानचा बचाव करण्‍याचा प्रयत्न केला. तो म्‍हणाला, ‘‘आतंकवादी पाकिस्‍तानमधून येतात, असे धरून चालले, तरी एक देश म्‍हणून पाकिस्‍तान स्‍वतः आतंकवाद्यांना भारतात कुठे पाठवत आहे ? त्‍यांना पाकिस्‍तानचे अध्‍यक्ष ‘भारतावर आक्रमण करा’, असे कुठे म्‍हणत आहेत?’’ पत्रकाराच्‍या या प्रश्‍नाचे उत्तर देतांना डॉ. जयशंकर म्‍हणाले, ‘‘पाकिस्‍तानने जगातील सर्व आतंकवाद्यांना आश्रय दिला आहे. तेथूनच ते प्रशिक्षण घेऊन भारतातील मुंबई शहर, संसद भवन आणि अन्‍य स्‍थानांवर आक्रमण करत असतात. जे आतंकवादी भारतावर आक्रमण करतात, त्‍यांना पाकमध्‍ये सैनिकी प्रशिक्षण दिले जाते. ‘युरोपची समस्‍या जगाची समस्‍या आहे; परंतु जगाची समस्‍या युरोपची समस्‍या नाही’, असा युरोपचा दृष्‍टीकोन आहे. तुम्‍हाला माहिती नाही की, २६.११.२००८ या दिवशीच्‍या मुंबई आक्रमणानंतर भारताला कशा प्रकारे त्रास सहन करावा लागला. त्‍यामुळे अशा प्रकारे तेच वक्‍तव्‍य करू शकतात, जे पाकिस्‍तानपासून लांब रहात असतात. त्‍यांच्‍यावर पाकच्‍या आतंकवादाचा कोणताही परिणाम होत नाही.’’ डॉ. एस्. जयशंकर पुढे म्‍हणाले, ‘‘रशिया युरोपकडे डोळे वटारून पहातो, तेव्‍हा संपूर्ण जगाने रशियाच्‍या विरोधात युरोपच्‍या पाठीशी उभे राहिले पाहिजे, अशी युरोपची अपेक्षा असते. अशा स्‍थितीत भारत किंवा आशिया यांच्‍या संदर्भात युरोपची वागणूक वेगळी का असते ?’’

ऑस्ट्‍रियाच्‍या पत्रकाराने मुक्‍तपणे विचारलेल्‍या प्रश्‍नांना डॉ. एस्.जयशंकर यांनी तेवढीच सडतोड उत्तरे दिली. या पत्रकाराच्‍या आडून डॉ. जयशंकर यांनी अप्रत्‍यक्षपणे युरोपला सुनावले, ‘तुम्‍ही तुमच्‍या दृष्‍टीतून इतिहास समजून घेऊ नका, तर जे सत्‍य आहे ते समजून घेऊन आपली दृष्‍टी व्‍यापक करा.’

३. रशिया-युक्रेन युद्धाच्‍या काळात भारताची यशस्‍वी भूमिका

रशिया-युक्रेन युद्धाच्‍या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेसह युरोपातील सर्व देशांची रशियाविरुद्ध असलेली अप्रसन्‍नता जगजाहीर आहे. ‘युक्रेन युुद्ध चालू असतांना कोणताही देश रशियाशी व्‍यापार किंवा व्‍यवहार करत असेल, तर अमेरिकेसाठी ती चिंतेची गोष्‍ट असेल’, अशी एक प्रकारे चेतावणीच अमेरिकेने सार्‍या जगाला दिलेली होती. भारताने मात्र नेहमीप्रमाणे सर्वांच्‍या हिताचा आदर करतांना त्‍याच्‍या राष्‍ट्रीय हिताला अनुरूप निर्णय घेण्‍याचे धोरण अवलंबले. युक्रेन युद्धानंतरच्‍या कठीण परिस्‍थितीतही भारताने संतुलन राखले आहे. पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन युद्धाला धरून पुतिन यांना सांगितले, ‘‘हे युद्ध करण्‍याचे युग नाही !’’ जी गोष्‍ट अमेरिका आणि मोठी राष्‍ट्रे यांनी पुतिन यांना सांगायला हवी होती, ती शेवटी मोदींना सांगावी लागली, असे जाणकारांचे मत आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्‍यातील शांती प्रस्‍थापित करण्‍याच्‍या संदर्भात आपली प्रतिबद्धता कायम ठेवून भारताने रशियाशी असलेल्‍या संबंधांना झळ पोचू दिली नाही. भारताने रशियाशी झालेले शस्‍त्रास्‍त्रांसंबंधी व्‍यवहार पूर्ण केलेच; पण रशियाकडून तेल विकत घेण्‍याच्‍या संदर्भात कुणाचा दबावही स्‍वीकारला नाही. याचा अर्थ असा नाही की, त्‍याने त्‍याच्‍या पाश्‍चात्त्य मित्र देशांच्‍या भावनांची कदर केली नाही. भारत आणि रशिया यांच्‍यातील घनिष्‍ट मैत्री टिकणे, हे या दोन देशांसाठीच नव्‍हे, तर संपूर्ण जगाच्‍या दीर्घकालीन हितासाठी आवश्‍यक आहे.

४. भारताच्‍या परराष्‍ट्र धोरणातील उदंड आत्‍मविश्‍वासामागे पंतप्रधान मोदी यांची मुख्‍य भूमिका

परराष्‍ट्र्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी देहलीमध्‍ये झालेल्‍या ‘रायसिना डायलॉग’च्‍या वेळी (रायसिना परिषदेच्‍या वेळी) विविध देशांच्‍या परराष्‍ट्र मंत्र्यांच्‍या उपस्‍थितीमध्‍ये भारताची केवळ दिशाच ठामपणे मांडली नाही, तर युरोपीय देशांच्‍या पालटणार्‍या वृत्तीलाही समोर ठेवण्‍यास विसरले नाही. रायसिना परिषदेतील चर्चासत्रामध्‍ये काही युरोपीय देशांच्‍या परराष्‍ट्रमंत्र्यांनी प्रश्‍न उपस्‍थित करून भारताला घेरण्‍याचा प्रयत्न केला. तेव्‍हा डॉ. एस्. जयशंकर यांनी त्‍यांना अफगाणिस्‍तानमधील घटनांचा उल्लेख करून ‘एक वर्षापूर्वी संपूर्ण नागरी समाजाला तालिबानच्‍या हाती मरण्‍यासाठी कसे सोडून देण्‍यात आले’, याची आठवण करून दिली. युक्रेन युद्धाच्‍या निमित्ताने भारताला जागवण्‍याचा प्रयत्न करणार्‍या युरोपीय देशांना हे सांगणे आवश्‍यकच होते. काही मासांपूर्वी अमेरिका आणि भारत यांच्‍यामध्‍ये चर्चा झाली. तेव्‍हा डॉ. एस्. जयशंकर यांना अमेरिकेच्‍या पत्रकारांनी काही प्रश्‍न विचारले. त्‍यामागे भारतावर टीका करण्‍याचाच उद्देश होता. ‘भारत रशियाकडून कच्‍चे तेल कसे काय आयात करतो ?’, असा त्‍यांचा प्रश्‍न होता. डॉ. एस्. जयशंकर म्‍हणाले, ‘‘युरोपीय देश रशियाकडून एक दिवसासाठी जेवढे कच्‍चे तेल आयात करतात, तेवढे तेल भारत एका मासात आयात करतो. त्‍यामुळे यासंदर्भात भारताला स्‍पष्‍टीकरण मागण्‍याआधी युरोपीय देशांनी आधी स्‍वत:ला पडताळणे आवश्‍यक आहे.’’

‘भारताने रशियाच्‍या विरोधात भूमिका घेतली पाहिजे’, अशी पाश्‍चिमात्‍य प्रसारमाध्‍यमांकडून सतत मागणी होत होती; परंतु भारताने तेच केले, जे देशाच्‍या हिताच्‍या दृष्‍टीने योग्‍य होते. भारताच्‍या परराष्‍ट्र धोरणामध्‍ये हा आत्‍मविश्‍वास अचानकपणे आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्‍ट्र धोरणाविषयी गेली ८ वर्षे जोरदार आणि परिणामकारक प्रयत्न केले. गेली ८ वर्षे परराष्‍ट्र धोरणाला प्राधान्‍य दिले. यात नरेंद्र मोदी यांनी ६० हून अधिक देशांना भेटी दिल्‍या, द्विपक्षीय आणि बहुपक्षीय स्‍तरावरील अनेक देशांशी बैठका घेतल्‍या, तसेच विविध देशांशी भागीदारी विकसित करण्‍याचा प्रयत्न केला.  भारताच्‍या या विशेष भूमिकेमुळे बहुराष्‍ट्रीय संघटनांनी देशाच्‍या परराष्‍ट्र धोरणामध्‍ये त्‍यांचे योगदान दिले आहे.

एकंदरीत मोदी यांच्‍या परराष्‍ट्र धोरणाचा विकास व्‍यवस्‍थितपणे झालेला आपणाला दिसतो. यापूर्वी भारताचे शेजारी राष्‍ट्रांशी घनिष्‍ठ संबंध होते. भारताने त्‍यांच्‍याशी संघर्ष न्‍यून करण्‍याचा प्रयत्न आणि संपर्क वाढवला. दक्षिण पूर्व आशियातील देशांशी संबंध स्‍थापित करण्‍यासाठी ‘लुक ईस्‍ट पॉलिसी’चे (ईशान्‍य भारतातील राज्‍ये आशिया खंडातील देशांना जोडणे) नाव पालटून ‘अ‍ॅक्‍ट ईस्‍ट’ (ईशान्‍य भारतामध्‍ये दळणवळण साधनांचा विकास) असे ठेवले. आता या देशांसमवेत प्रलंबित प्रकल्‍प पूर्ण करण्‍याचा प्रयत्न होत आहे. अशाच प्रकारे इस्‍लामी राष्‍ट्रांशीही गुंतवणूक केली.

५. रशिया आणि अमेरिका या देशांमध्‍ये संतुलन राखणारा जगातील एकमेव देश भारत !

भारताने इस्‍लामी राष्‍ट्र संयुक्‍त अरब अमिरातशी एका खुल्‍या व्‍यापार करारावर स्‍वाक्षर्‍या केल्‍या. त्‍यामुळे रशिया-युक्रेन संघर्षाच्‍या वेळी भारताला तेलाची कमतरता भासली नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्‍ट, म्‍हणजे रशिया आणि अमेरिका या देशांमध्‍ये संतुलन राखणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. भारत इस्रायल-पॅलेस्‍टाईन यांच्‍या समवेतच शिया आणि सुन्‍नी पंथीय असलेल्‍या अनेक देशांशीही संबंध संतुलित करत आहे. त्‍यामुळे आता ‘भारताला संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेचे स्‍थायी सदस्‍यत्‍व मिळावे’, ही मागणी जोर धरत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्‍यातील संघर्षांच्‍या काळात भारताच्‍या या प्रगतीमुळे जग आश्‍चर्यचकित झाले आहे. भारताने कोरोना महामारीच्‍या काळात अनेक देशांकडून आलेली लसीची मागणी पूर्ण केली. त्‍यामुळे भारत आता आरोग्‍यविषयक सेवा देणार्‍याच्‍या  स्‍वरूपात समोर आला आहे. भारताचा हा आर्थिक विकास परराष्‍ट्र धोरणाला बळकटी देत आहे. भारत लवकरच आशियातील एक प्रमुख शक्‍तीच्‍या रूपात उभारेल, यात कोणतीही शंका नाही.

६. भारताच्‍या यशस्‍वी परराष्‍ट्र धोरणात ‘वसुधैव कुटुम्‍बकम्’चा महत्त्वाचा वाटा

वर्ष २०१४ नंतर भारताच्‍या परराष्‍ट्र धोरणामध्‍ये क्रांतीकारी पालट झाले आहेत. त्‍यामुळे देशाचे परराष्‍ट्र धोरण बचावात्‍मक न रहाता आक्रमक होत आहे. भारत त्‍याच्‍या परराष्‍ट्र धोरणाची योजना सामरिक हितांना लक्षात ठेवून बनवतो. महत्त्वाचे  म्‍हणजे भारत आता सर्वांशी समान स्‍तरावर बोलणी करत आहे. अलीकडेच पाकिस्‍ताचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्‍या परराष्‍ट्र धोरणाची स्‍तुती केली होती. आज चीन भारताच्‍या विरोधात कितीही संकटे निर्माण करण्‍याचा प्रयत्न करत असेल; पण भारतावर आक्रमण करण्‍याचे साहस करत नाही. ‘आता भारत वर्ष १९६२ चा राहिलेला नाही’, ही गोष्‍ट चीनला समजावून सांगण्‍यात भारताची कुटनीती यशस्‍वी ठरत आहे. यापूर्वी भारत जगातील मोठमोठ्या देशांच्‍या दृष्‍टीकडे पाहून त्‍याचे परराष्‍ट्र धोरण ठरवत होता; परंतु आज सर्व जग भारताचे ऐकत आहे. सध्‍याचा भारत जगाला जागतिक दृष्‍टी देण्‍याच्‍या स्‍तरावर पोचला आहे. भारत त्‍याचे स्‍वतंत्र धोरण जगासमोर ठेवत आहे आणि जग ते लक्षपूर्वक ऐकत अन् समजून घेत आहे. याचा परिणाम येणार्‍या काळात भारतात, तसेच जगात तीव्र गतीने जाणवेल. म्‍हणतात ना, स्‍वातंत्र्याला सार्थक करण्‍याच्‍या शक्‍तीचा आधार हवा. ही शक्‍ती भारताच्‍या सनातन काळापासून चालत आलेल्‍या ‘वसुधैव कुटुम्‍बकम्’ (संपूर्ण पृथ्‍वी हेच कुटुंब) दृष्‍टीकोनातच आहे.

लेखक : अमोल पेडणेकर (साभार : साप्‍ताहिक ‘विवेक’, हिंदी)