१६.३.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘दशदिक्पाल पूजन’ आणि १७.३.२०२३ या दिवशी ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ याग होणार होता. त्याच्या २ दिवस आधीपासूनच मला आध्यात्मिक त्रास होऊ लागला. तेव्हा ‘अन्य बर्याच साधकांनाही पुष्कळ त्रास होत आहे’, असे त्यांच्या बोलण्यातून माझ्या लक्षात आले.
१. ‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ याग होण्यापूर्वी झालेले आध्यात्मिक त्रास !
१ अ. अस्वस्थता जाणवणे : ‘१३ आणि १४.३.२०२३ या दोन्ही दिवशी मला पुष्कळ अस्वस्थ वाटत होते. ध्यानमंदिरात बसून २ – ३ घंटे नामजपादी उपाय केल्यावर त्रास माझा उणावत होता; पण मला काहीच करावेसे वाटत नव्हते.
१ आ. शारीरिक त्रास होणे : मला रात्री झोप येत नव्हती आणि वातावरणात पुष्कळ उष्णता जाणवत होती. ‘पाणी पिऊनही घसा कोरडाच आहे’, असे मला वाटत होते. माझे डोके पुष्कळ जड झाले होते.
१४.३.२०२३ या दिवशी मानसरित्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत जाऊन मी त्यांना बराच वेळ आळवले. त्यानंतर मला ‘देवद येथील आश्रमात ‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ याग होणार आहे’, असे कळले. तेव्हा ‘देवाने माझी प्रार्थना ऐकली असून या यागांच्या माध्यमातून देव साधकांचे त्रास न्यून करणार आहे’, या विचाराने मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
१ इ. ‘दशदिक्पाल पूजना’च्या दिवशी झालेले आध्यात्मिक त्रास !
१ इ १. ‘दशदिक्पाल पूजना’च्या दिवशी शारीरिक त्रास वाढत जाऊन वेदना असह्य होणे : १६.३.२०२३ या दिवशी सेवा करतांना मला अकस्मात् पुष्कळ शिंका येऊ लागल्या. बर्याचदा मला होणारा आध्यात्मिक त्रास उणावतांना मला शिंका येतात; पण या वेळी मला अस्वस्थ वाटून ती अस्वस्थता वाढतच गेली. त्यामुळे मी खोलीत आले. घरी गेल्यावर माझे अंग दुखू लागले. सायंकाळी होणार्या ‘दशदिक्पाल पूजना’चा लाभ व्हावा’, यासाठी मी पुन्हा आश्रमात आले. आश्रमात प्रवेश करतांनाच चक्कर येऊन माझ्या डोळ्यांपुढे अंधारी आली. काही वेळाने मला थोडे बरे वाटले; पण अंगदुखी फार वाढल्यामुळे मी खोलीवर आले. अंगदुखीच्या समवेत माझ्या दात आणि हिरड्या यांतही वेदना होऊ लागल्या. मला वेदना असह्य होऊ लागल्यामुळे रडू आले. त्यातच मला १०२ ते १०३ डिग्री फॅरनहाईट एवढा ताप आला. तेव्हा ‘माझ्यावर सर्व दिशांनी वाईट शक्तींची आक्रमणे होत आहेत’, असे मला वाटले. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. तापाचे औषध घेऊनही मला घाम आला नाही. मी निपचित पडून राहिले. रात्री २ वाजता आईने माझ्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवल्यावर ताप थोडा उणावला.
२. ‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ याग होतांना देवाच्या कृपेने हळूहळू त्रास न्यून होणे
२ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि ‘दशदिक्पाल पूजन’ यांमुळे शरिराभोवती सुरक्षाकवच निर्माण झाल्यामुळे या त्रासांत जिवंत रहाणे : एवढा त्रास होत असतांनाही माझ्याकडून ‘दशदिक्पाल पूजना’चा लाभ होण्यासाठी प्रार्थना होत होत्या. माझ्या डोळ्यांसमोर काही काही क्षणांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा चेहरा येऊन नंतर केवळ हलका पांढरा प्रकाश दिसत होता. गुरुकृपेने ‘माझ्या देहाभोवती १ फूट अंतरापर्यंत ‘दशदिक्पाल पूजना’चे कवच निर्माण झाल्यामुळे मी जिवंत राहिले’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.
२ आ. ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ याग होतांना प्रार्थना अल्प होऊनही शरीर हलके होणे : दुसर्या दिवशी ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ याग होतांना मी पूर्णच गळून गेले होते. त्यामुळे माझ्याकडून अल्प प्रमाणात प्रार्थना झाल्या, तरीही दिवसा बर्याच प्रमाणात जड झालेले शरीर रात्रीनंतर थोडे हलके झाले.
२ इ. हा आध्यात्मिक त्रास, म्हणजे ‘यागाच्या माध्यमातून झालेले सूक्ष्मातील युद्ध होते’, असे वाटणे : माझ्या अंगात दोन दिवस पुष्कळ प्रमाणात ताप होता. तेव्हा ‘माझ्या पेशीपेशीतील काळी (त्रासदायक) शक्ती या यागाच्या प्रभावाने बाहेर पडत आहे’, असा विचार माझ्या मनात आल्याने ताप आला, तरी मला ते स्वीकारता आले; परंतु मला असह्य वेदना होत होत्या आणि त्या सहन करण्याविना मला काहीच करता येत नव्हते. याग संपल्यावर माझ्या डोक्यात मुंग्या आल्या आणि नंतर मला पुष्कळ घाम आला. मी झोपलेल्या खोलीत विचित्र दुर्गंध येत होता. तेव्हा ‘या यागाच्या माध्यमातून झालेले युद्ध अत्युच्च स्तरावरचे होते’, याची मला पुसटशी कल्पना आली.
‘भगवंताने जणू आम्हा साधकांचे त्रास उणावण्यासाठीच ‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ याग केला’, असे वाटून त्याच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.’
३. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेली ‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ यागाची छायाचित्रे पहातांना जाणवलेली सूत्रे
३ अ. ‘दशदिक्पाल पूजन’, म्हणजे दहा दिशांच्या देवतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जागृत केले’, असे वाटणे : ‘१८.३.२०२३ या दिवशी मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेली ‘दशदिक्पाल पूजना’ची छायाचित्रे पाहिली. त्या ठिकाणी केलेली कलशांची मांडणी पहातांना माझे मन वेगळ्याच विश्वात गेले. ‘दहा दिशांच्या देवतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जागृत केले आहे’, असे मला जाणवले.
३ आ. ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ यागाची छायाचित्रे पहातांना ‘देवतेच्या चित्राच्या ठिकाणी देवता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राच्या ठिकाणी प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉ. आठवले विराजमान आहेत’, असे जाणवणे : १९.३.२०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेली ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ यागाच्या संदर्भातील छायाचित्रे पहातांना मला ‘हा याग रामनाथी आश्रमातच झाला’, असे वाटले. यागाच्या ठिकाणी ठेवलेल्या देवतेच्या चित्राच्या ठिकाणी देवता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राच्या ठिकाणी प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉ. आठवले विराजमान आहेत’, असे मला जाणवत होते. तसेच ‘या यागाची मांडणी आकाशात केली असून मी वेगळ्याच लोकात हा याग अनुभवत आहे’, असे मला जाणवले.
४. ‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ याग होतांना देवाच्या कृपेने आलेल्या अनुभूती
४ अ. ‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ याग झाल्यानंतर आध्यात्मिक त्रास उणावून आपोआप नामस्मरण होणे : १६.३.२०२३ या दिवशी ‘दशदिक्पाल पूजन’ झाल्यानंतर माझ्याकडून आपोआप काही वेळ आणि १७.३.२०२३ या दिवशी अर्धा घंटा नामस्मरण झाले. गेले कित्येक मास नामजप करायला बसल्यावर मला प्रयत्नपूर्वक नामजप करावा लागत असे, उदा. लिहून, पूटपूटून किंवा हातात माळ घेऊन; परंतु यागानंतर माझा अर्धा घंटा नामजप उत्स्फूर्तपणे झाला आणि मला हलके वाटले. १८ आणि १९.३.२०२३ या दिवशी मला ‘१ घंटा नामजप करावा’, असे वाटून तो आनंदाने करता आला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे भावपूर्ण स्मरण झाले आणि मला होणारा आध्यात्मिक त्रास उणावून मला पुष्कळ हलके वाटले.
४ आ. माझ्या अवतीभोवती मला पुष्कळ गारवा अनुभवता येत होता. याविषयीचे लिखाण करतांनाही मला आल्हाददायक वाटत होते.
हे गुरुराया, आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, फोंडा, गोवा. (१९.३.२०२३)
|