१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाला बालसाधकांच्या वैशिष्ट्यांची लहान चित्रफीत सिद्ध करण्यास सांगणे
‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला सांगितले, ‘‘दैवी बालसाधकांचे विचार, त्यांची बोलण्याची पद्धत आणि त्यांची उत्तरे देण्याची पद्धत इत्यादींसंबंधी लहान चित्रफीत सिद्ध करून आश्रमातील साधक आणि अतिथी यांना दाखवूया.’’ गुरुदेवांच्या आज्ञेनुसार मी ‘आपल्याकडील दैवी बालसाधकांची गुणवैशिष्ट्ये समाजापर्यंत पोचावीत, तसेच साधकांनाही त्यातून शिकता यावे’, यासाठी गुरुस्मरण करून या सेवेला प्रारंभ केला.
२. एरव्ही चित्रफिती अंतिम करतांना काही वेळेलाच त्या योग्य प्रकारे जोडल्या जाणे; पण या वेळी सर्व चित्रफिती योग्य प्रकारे जोडल्या जाणे आणि सेवा अल्पावधीत पूर्ण होणे
मला या संदर्भातील काही चित्रफिती अंतिम करण्याची सेवा होती. मला ही सेवा करतांना त्यांतील ४ – ५ चित्रफितींमध्ये दैवी बालसाधकांच्या बोलण्याला प्रतिसाद देणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चित्रफिती त्या त्या ठिकाणी जोडायच्या होत्या. या प्रक्रियेला काही अवधी लागतो. एरव्ही अशा प्रकारे मी चित्रफिती जोडत असतांना माझ्याकडून काही वेळेलाच त्या योग्य प्रकारे जोडल्या जातात. त्या दिवशी ही सेवा करण्यासाठी माझ्याकडे थोडाच अवधी होता. मला काही वेळातच चित्रीकरणाच्या सेवेसाठी जायचे होते. त्यामुळे माझ्या मनात त्या सेवेचा विचार होता.
चित्रफीत जोडण्याची सेवा करतांना माझ्याकडून पहिली चित्रफीत योग्य प्रकारे चपखलपणे जोडली गेली. पहिल्यांदा योग्य झालेले पाहून मला वाटले, ‘हा योगायोग असू शकतो’; परंतु त्याच चित्रफितीमधील अन्य एका ठिकाणीच नव्हे, तर बाकीच्या सर्व चित्रफितींच्या संदर्भात मला अशीच अनुभूती आली. त्यामुळे ‘जी सेवा पूर्ण करण्यासाठी २ – ३ घंटे लागतील’, असे मला वाटत होते, ती सेवा अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण झाली. त्यानंतरचा उपलब्ध वेळ मला त्या चित्रफितींना अंतिम स्वरूप देऊन लघुपट तयार करण्यासाठी वापरता आला. त्यामुळे कुठेही वेळ वाया न जाता त्याचा पूर्ण उपयोग झाला.
‘गुरुदेवांच्या संकल्पानुसार सेवा करायला घेतल्यास तो संकल्प कसा कार्य करतो आणि अत्यल्प कालावधीतच सेवा कशा पूर्णत्वाला जाऊ शकतात ?’, याची गुरुदेवांनी दिलेली ही अनुभूतीच आहे. अशी अनुभूती वर्ष २०१२ – २०१३ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांची एक चित्रफीत करतांना मला आली होती. तशीच अनुभूती मला गुरुदेवांच्या कृपेने आता पुन्हा दैवी बालसाधकांच्या चित्रफिती सिद्ध करण्याच्या माध्यमातून आली.
‘गुरुदेवांनी दिलेल्या अनुभूतींचा माझ्या व्यष्टी आणि समष्टी साधनेत लाभ होऊन साधनेत त्यांना अपेक्षित अशी प्रगती साध्य होवो’, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. सत्यकाम कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |