पुण्यातील वेताळ टेकडी वाचवण्यासाठी ‘लाँग मार्च’ !

“SAVE Vetal Tekdi”

पुणे – वेताळ टेकडी येथील प्रस्तावित असलेल्या बालभारती ते पौड फाटा रस्ता, २ बोगदे या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी ‘वेताळ टेकडी कृती समिती’च्या वतीने भरपावसामध्ये ‘वेताळबाबा चौक ते खांडेकर चौक’दरम्यान ‘लाँग मार्च’ काढण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी सामील झाले होते. असंख्य नागरिक प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी विविध टेकड्यांवर फिरायला जातात. त्यातील वेताळ टेकडीवर रस्ता सिद्ध करण्याचा घाट घातला जात आहे. शहरातील टेकड्या हे फुफ्फुस असून त्या वाचवल्या पाहिजेत. वेताळ टेकडीवर कोणत्याही प्रकारचा प्रकल्प होता कामा नये. या विरोधात आम्ही अखेरपर्यंत लढा देणार, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार वंदना चव्हाण यांनी मांडली.

‘लाँग मार्च’ मध्ये सहभागी पर्यावरणप्रेमी

वेताळ टेकडी येथील बालभारती ते पौडफाटा रस्ता प्रस्तावित आहे. त्या रस्त्याचा १५ टक्केही नागरिक वापर करणार नसल्याचा अहवाल समोर आला आहे; परंतु हा रस्ता करण्यास प्रशासन का हट्ट करत आहे ? कोणत्याही परिस्थितीत रस्ता आणि बोगदा होता कामा नये, हीच माझी भूमिका असल्याचे भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितली.

#savevetaltekdi