व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधकाला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

व्लादिमिर कारा-मुर्जा

मॉस्को (रशिया) – रशियामधील विरोधी पक्ष नेते व्लादिमिर कारा-मुर्जा यांच्यावर तेथील न्यायालयाने राष्ट्रद्रोहाचा ठपका ठेवत २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. मुर्जा यांनी युक्रेनमध्ये चालू असलेल्या युद्धावरून रशियावर टीका केली होती, तसेच त्यांनी रशियन सैन्याविषयी खोटी माहिती प्रसारित करून एका देशविरोधी संघटनेला समर्थन दिल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यांना ४ लाख रुबल्सचा (४ लाख ३ सहस्र रुपयांचा) दंडही ठोठावण्यात आला आहे.

१. मुर्जा यांना आतापर्यंत सर्वाधिक वर्षांची शिक्षा झाली असून त्यांनी मात्र त्यांच्या विरोधातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

२. मुर्जा यांना एका वर्षापूर्वी अटक करण्यात आली. त्यांनी गेल्या वर्षी अमेरिकेमधील एका कार्यक्रमात रशियाच्या विरोधात वक्तव्य करत दावा केला होता की, रशियन सैन्य युक्रेनमध्ये युद्ध गुन्हे करत असून रहिवासी ठिकाणे, तसेच रुग्णालये आणि शाळा येथे बाँबस्फोट घडवून आणत आहे.

३. आतापर्यंत मुर्जा यांच्यावर दोनदा विषप्रयोगही करण्यात आला आहे.

४. कारा मुर्जा यांना देण्यात आलेली शिक्षा हे धक्कादायक आहे, असे मत ब्रिटनचे परराष्ट्र सचिव जेम्स क्लेव्हर्ली यांनी व्यक्त केले आहे.